Monday, February 16, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘इस्रो’च्या भेटीसाठी आश्रमशाळेतील 13 विद्यार्थ्यांची निवड

Ø इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा उपक्रम

यवतमाळ :- इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विजाभज निवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी अंतराळ संशोधन क्षेत्राची प्रत्यक्ष ओळख व्हावी यासाठी दि. 15 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास दौऱ्यांतर्गत जिल्ह्यातील 13 विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या बंगळुरु, तिरुअनंतपुरम व कन्याकुमारी येथील केंद्रांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ संशोधनाबद्दल स्वारस्य निर्माण करणे, विज्ञान विषयाबद्दल जागरूकता वाढविणे तसेच इस्रोच्या यशोगाथेची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळवून देणे हा आहे. राज्यातील विविध आश्रमशाळांमधून एकूण 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यापैकी जिल्ह्यातील 5 आश्रमशाळांमधील 7 मुले व 6 मुली अशा एकूण 13 विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेद्वारे निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विजाभज माध्यमिक आश्रमशाळा, लोणी ता. आर्णी येथील अनुराग गजानन राठोड, देविदास डोमा राठोड व ज्ञानदीप हरिचंद्र राठोड; राजर्षी शाहू महाराज विजाभज माध्यमिक आश्रमशाळा, दारव्हा येथील सुमित विनोद जाधव, टी. जी. देशमुख माध्यमिक आश्रमशाळा, आमणी बु. ता. महागाव येथील अर्जुन नारायण पवार, स्व. संगडाजी नाईक विजाभज माध्यमिक आश्रमशाळा, शिवपुरी ता. कळंब येथील समीर अनिल जाधव, तन्मय अरविंद आडे, कशिश शेरसिंग चव्हाण, विद्या बंडू मस्के, श्रावणी देवानंद मेश्राम, कल्याणी सखाराम राठोड व ईश्वरी कैलास जाधव तसेच स्व. सजनीबाई आडे विजाभज उच्च माध्यमिक आश्रमशाळा, महाळुंगी ता. आर्णी येथील गौरी पंकज काटकर यांचा समावेश आहे.

या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना अंतराळ तंत्रज्ञान, उपग्रह प्रक्षेपण प्रक्रिया, संशोधन सुविधा तसेच वैज्ञानिकांच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक ओमप्रकाश नगराळे यांनी दिली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com