नागपूर :- अवघ्या ५ वर्षांच्या अरहंत नितेश थुल याने आपल्या असामान्य ज्ञानसंपदा आणि प्रभावी वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत इतिहास रचला आहे. त्याला “Youngest Knowledge Wizard with Remarkable Public Speaking Skills” या प्रतिष्ठित राष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात आले.
हा बहुमान केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरात आयोजित भव्य पुरस्कार वितरण समारंभात प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे अरहंतच्या विलक्षण प्रतिभेची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अडीच वर्षांच्या कोवळ्या वयापासून अरहंतने सार्वजनिक व्यासपीठावर बोलण्यास सुरुवात केली. आज तो सामाजिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी विषयांवर आत्मविश्वासाने प्रभावी भाषणे देत असून आपल्या वयातील मुलांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. अरहंतच्या या यशामुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध क्षेत्रांतून त्याचे व कुटुंबियांचे अभिनंदन करण्यात येत आहे.





