शहीद सफाई सैनिक दिन साजरा
नागपूर, १ : शहराला स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ५० गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा नागपूर महानगरपालिकेच्यावतीने ‘शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त गुरुवारी (ता.३१) सत्कार करण्यात आला. गुणवंत सफाई कामगारांचा शाल, श्रीफळ, तुळशी रोपटे आणि प्रत्येकी 5 हजारांचा धनादेश देऊन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत व घनकचरा विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त सभा कक्षात आयोजित समारंभात मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, मुख्यालय झोनल अधिकारी लोकेश बासनवार, सर्व झोनल अधिकारी, स्वच्छता निरीक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी वाल्मिकी आणि महर्षी सुदर्शन महाराज यांच्या फोटोला माल्यापर्ण करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी ३१ जुलै शहीद सफाई सैनिक दिनाचे महत्त्व विषद केले. सफाई कामगारांच्या तत्परतेमुळे शहर स्वच्छ आणि सुंदर आहे. शहराची सफाई करणे हे मेहनतीचे काम आहे. असे. अशा सफाई कामगार दरदिवशी शहराला स्वच्छ ठेवत असतात यामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य चांगले राहण्यात मदत होते. चांगले कर्तव्य करणाऱ्या सफाई कामगारांचा सत्कार मनपातर्फे केला जात असून हा सत्कार इतर कामगारांनाही प्रेरणादायी ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
उपायुक्त राजेश भगत म्हणाले की, शहराला सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याकरिता सफाई कामगार कर्तव्यावर हजर असतात. शहराला स्वच्छ ठेवून नागरीकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जे सफाई कामगार चांगले काम करतात त्यांचा सत्कार मनपातर्फे करण्यात येत आहे. तसेच पुढेही अशा गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात येणार आहे. सफाई कामगारांच्या या सत्कारामुळे इतर कामगारांनाही प्रेरणा मिळेल.
यावेळी जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी प्रास्ताविकात ३१ जुलै १९५४ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या न्यायिक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलकांवर झालेल्या गोळीबारात सफाई कर्मचारी भूपसिंग शहीद झाले. त्यांच्या स्मृतीमध्ये देशभर हा दिवस शहीद सफाई कर्मचारी दिवस म्हणून साजरा केला जातो. महानगरपालिकेमध्ये सफाई कामागराचे प्रमाण अधिक असल्याने मागील काही वर्षापासून ३१ जुलै रोजी गुणवंत स्थायी सफाई कामगारांचा सत्कार करण्यात येत असल्याचे सांगितले.








