– काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत प्रशासनाची कार्यवाही; आजारी विद्यार्थिनीला एसडीआरएफच्या मदतीने उपचारासाठी हलविले
गडचिरोली :- छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीत जिल्हा प्रशासनाने ५२५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. ही कार्यवाही काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आता पाणी ओसरू लागल्याने परिस्थितीत सुधारणा होत आहे.
पूरस्थिती निर्माण होताच जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार किशोर बागडे यांच्या नेतृत्वात स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्थलांतराची कार्यवाही केली. बाधित भागातील परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, बिनागोंडा आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका आजारी मुलीला एसडीआरएफ पथकाच्या मदतीने गुंडेनूर नाला ओलांडून सुरक्षितपणे लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
पाणी ओसरत असले तरी नदीकाठच्या व सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि पाणी वाहत असलेल्या मार्गांवरून प्रवास करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



