– वकील व पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– 39 हुन अधिक 5 वर्षे ते 10वर्षे जुनी प्रकरणे समझोत्याने निकाली
यवतमाळ :- जिल्ह्यातील विविध न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 7 हजार 256 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व सर्वोच्च नान्यालय,दिल्ली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरनाचे अध्यक्ष नागेश वि. न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली 13 सप्टेंबर 2025 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते.
या राष्ट्रीय लोकअदालतचे उद्घाटन न्यायमूर्ती वृषाली वि. जोशी, उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ नागपुर हया उपस्थित होत्या व त्यांनी रोपटयांना पाणी देउन राष्ट्रीय लोकअदालतच्या कामकाजाची सुरवात केली. तसेच त्यांनी लोकअदालतीचे महत्व समजावून पक्षकारांना व विधिज्ञांना जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढणेबाबत आवाहन केले. यावेळी एस.यु. बघेले, प्र. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ, दिपक एच. दाभाडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ तसेच यवतमाळ जिल्हयातील सर्व न्यायीक अधिकारी, वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन, तसेच जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायीक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार आदी उपस्थित होते.
या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये न्यायालयात प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका व विशेष म्हणून जिल्हा परिषद अंतर्गतचे ग्रामपंचायत कराबाबतची वादपूर्व प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतसमोर ठेवण्यात आली होती. ही प्रकरणे मोठ्या संख्येने आपसी तडजोडीने मिटविण्यासाठी प्र. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.यु. बघेले, आणि दिपक एच. दाभाडे व जिल्ह्यातील कार्यरत त्यांचे सहकारी न्यायाधीशांनी यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यासाठी वेळोवेळी शासकीय अधिकारी, वकील, पक्षकार, विविध संस्थेतील व राष्ट्रीयकृत बँकेतील पदाधिकार्यांच्या बैठका बोलविल्या व त्यांना राष्ट्रीय लोकअदालतचे महत्व पटवून दिले.
या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पक्षकारांना स्वच्छेने व सामंजस्याने वाद अंतिमरित्या मिटविता येते याची खात्री पटल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील 2138 प्रलंबित प्रकरणे व 5118 वादपूर्व प्रकरणे असे एकूण 7256 प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतमध्ये आपसी तडजोडीने निकाली निघाली. या निकाली निघालेल्या प्रकरणांचे एकूण तडजोड मूल्य 20 कोटी 8 लाख 76 हजार 227 रूपये होते. यामध्ये विशेष मोहिमेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील सर्व न्यायालयातून 1680 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्ह्यातील तालुका विधी सेवा समित्यांनी तसेच सर्व न्यायाधीश व कर्मचारी यांनी आयोजित राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सहा. सरकारी वकील, उपजिल्हाधिकारी, भू-अर्जन अधिकारी, बेंबळा प्रकल्पाचे अधिकारी व सहकारी, बँका, संस्थाचे अधिकारी, विमा कंपन्याचे अधिकारी, पोलीस अधिकारी, परिवहन विभाग नियंत्रक, वकील आणि स्वंयसेवक तसेच जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी व इतरांचे राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळाले.




