कामठीमध्ये धाडसी चोरी तब्बल २ लाख ३९ हजारांचा ऐवज लंपास

0
59

कामठी ३० : नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका मोठ्या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सैलाब नगर बोगद्याजवळील रेल्वे ग्राउंड परिसरातील तात्पुरत्या त्रिपालात राहणाऱ्या नागरिकांच्या घरातून तब्बल २ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.

फिर्यादी निवलसिंग बलवंतसिंग चितोडिया (वय ४५) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्टच्या मध्यरात्री ११:५९ वाजेपासून ते २९ ऑगस्टच्या पहाटे ५ वाजेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली. त्रिपालात ठेवलेल्या लोखंडी पेटीतून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण १ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.

याशिवाय शेजारी राहणारे लक्ष्मणसिंग नथ्थासिंग चितोडिया (वय ७५) यांच्या त्रिपालातूनही चोरट्यांनी धाडसी हात मारत सोन्या-चांदीचे दागिने आणि तब्बल ७० हजार रुपयांची रोख रक्कम चोरली.

चोरट्यांनी लांबवलेल्या वस्तूंमध्ये सोन्याचे व चांदीचे दागिने, बंजारण ड्रेससाठी खास चांदीची बटणे, रोख ४०,००० रुपये,
तसेच विवो वी 29 मोबाईल अशा किमती वस्तूंचा समावेश आहे.

घटनेनंतर फिर्यादी यांनी २९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी कलम ३०५(अ), ३३१(२) बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

या धाडसी चोरीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

तपास अधिकारी नविन कामठी पोलीस स्टेशन चे
पोलिस उपनिरीक्षक सृष्टी कदम यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे