Home Latest News निरोगी आयुष्यासाठी फिजिओथेरपीचे वाढते महत्त्व

निरोगी आयुष्यासाठी फिजिओथेरपीचे वाढते महत्त्व

0
58

 

नागपूर ८ : आज जागतिक फिजिओथेरपी दिन म्हणून साजरा केला जात आहे. १९९६ पासून या दिवसाची अधिकृत सुरुवात झाली असून यंदाचा विषय “सक्रिय व निरोगी वृद्धत्व” असा आहे. वयोमानानुसार शरीरात बदल होत जातात आणि त्यामुळे हालचालींवर मर्यादा येतात. गुडघेदुखी, पाठदुखी, सांध्यांची कडकपणा, तसेच चालताना तोल जाणे या समस्या वाढतात. परिणामी दैनंदिन कार्यक्षमता, स्वावलंबन आणि जीवनमानावर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर व्यायामासोबत फिजिओथेरपीची गरज अधिक अधोरेखित होते.

तज्ज्ञांच्या मते, फिजिओथेरपीमुळे स्नायूंची ताकद व लवचिकता वाढते, वेदना व सूज कमी होते आणि चालण्यात संतुलन सुधारते. यामुळे पडण्याचा धोका कमी होतो. अपघातानंतर किंवा शस्त्रक्रियेनंतरच्या पुनर्वसन प्रक्रियेत फिजिओथेरपीची मदत अत्यावश्यक ठरते. तसेच लकवा किंवा न्यूरोलॉजिकल समस्येनंतर मज्जासंस्थेचे पुनःप्रशिक्षण करून रुग्णाला अधिक स्वावलंबीपणे दैनंदिन जीवन जगता येते.

फिजिओथेरपीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे हालचाली पुन्हा कार्यक्षम करणे, दुखापतींची शक्यता कमी करणे व जीवनमान उंचावणे. ऑर्थोपेडिक, न्यूरोलॉजी, बालरोग, महिला आरोग्य, हृदय-श्वसन प्रणाली, खेळाडूंसाठी खास उपचार आणि जेष्ठ नागरिकांसाठी विशेष उपचार अशा विविध शाखांमध्ये फिजिओथेरपीचे व्यापक योगदान आहे.

निरोगी वृद्धत्वासाठी योग्य व्यायाम, संतुलित आहार आणि वेळेवर घेतलेली फिजिओथेरपी यामुळे औषधांवरील अवलंबित्व कमी होते व शरीर नैसर्गिकरीत्या सक्रिय राहते. त्यामुळे वृद्धत्व हा टप्पा असला तरी तो निरोगी, उत्साही आणि सक्रिय ठेवणे शक्य होते.

डॉ. दिव्या दमाहे (फिजिओथेरपिस्ट) यांचे मत

फिजिओथेरपीचा मुख्य उद्देश म्हणजे वेदना कमी करणे, हालचाली सुधारून घेणे आणि स्नायूंना बळकट करणे. अनेक आरोग्य समस्यांवर ही एक प्रभावी उपचारपद्धती ठरते. डॉ. दमाहे यांच्या मते, दुखापत झाल्यानंतर किंवा शस्त्रक्रियेनंतरच्या पुनर्वसनासाठी फिजिओथेरपी अत्यावश्यक आहे. यामुळे रुग्णाला दैनंदिन कामे अधिक सुलभतेने करता येतात आणि शरीर पुन्हा सक्रिय होते.

तसेच, मधुमेह, संधिवात किंवा हृदयविकारांसारख्या दीर्घकालीन आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही फिजिओथेरपी उपयुक्त ठरते. नियमित उपचारांमुळे रुग्णाचे जीवनमान उंचावते, औषधांवरील अवलंबित्व कमी होते आणि दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत होते.

 

डॉ. दमाहे यांचा ठाम विश्वास आहे की, योग्य वेळी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली फिजिओथेरपी रुग्णाला पुन्हा स्वावलंबी आणि उत्साही जीवन जगण्यासाठी सक्षम करते.