तिरोडा :- ‘मी आणली भाजी, ताजी ताजी भाजी… आजी गं आजी, कर ना गं भाजी..’ या बडबड गीतातील आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. आजी आणि तिचा औषधी गुणकारी बटवा व मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख व महत्त्व सांगणारा रानभाज्या महोत्सव भजेपार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्साहात पार पडला.
शाळेच्या विद्यार्थ्यांमधून कुणी अळू आणले, कुणी भोंबोडी आणली… कोयलारी, करटूले, खेडा, शेवगा भाजी आणली.
केळीच्या पानावर या रानभाज्या मांडून फुलांनी सजवण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी भाज्यांपासून आकर्षक रांगोळीही तयार केली होती. या महोत्सवाचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या पटले, मुख्याध्यापक रामेश्वर बावनकर, दीपिका मेश्राम यांनी फीत कापून केले. शिक्षक तानसेन जमइवार, श्रीकांत चौगुले, भाग्यश्री रेवडेकर, वर्षा अंबुले यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. केंद्रप्रमुख ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
‘दररोजच्या आहारात रानभाज्यांचा वापर करायला हवा. रानभाज्या आम्ही आवडीने खाणार’ अशी प्रतिज्ञा रामेश्वर बावनकर यांनी विद्यार्थ्यांना दिली. उद्घाटनावेळी डॉ. विद्या पटले म्हणाल्या, चायनिजचे व तेलकट पदार्थ खाण्याऐवजी नैसर्गिक भाज्या खाव्यात. या रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. शाळेने राबवलेला हा उपक्रम स्तुत्य असून विद्यार्थी व पालकांसाठी उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी उपस्थितांना भाज्यांची नावे, त्यांचे औषधी गुणधर्म आणि त्यांचे आहारातील महत्त्व सांगितले.
जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानावर, लागवड न करता निसर्गतः या रानभाज्या वाढत असतात. या वनस्पतींमध्ये खनिजे, महत्त्वाची मूलद्रव्ये, अत्यंत उपयोगी रसायने, अनेक औषधी गुणधर्म असतात. ऋतूनुसार या भाज्या सहज उपलब्ध होत असतात. जंगलालगतचे आदिवासी बांधव रानभाज्यांचा आहारात वापर करतात. हा समृद्ध ठेवा आपण आपल्या आरोग्यासाठी जतन करायला हवा. यासाठी हा उपक्रम राबविल्याची माहिती शिक्षिका भाग्यश्री रेवडेकर यांनी यावेळी दिली.
रानभाज्यांपासून बनवलेल्या विविध पदार्थांची ‘पाककला स्पर्धा’ घेण्यात आली. यामध्ये मुंगण्याचे वडे, अळूची वडी, खेडा भाजी, भोंबोडी भाजी आदी पदार्थ बनवून सजवण्यात आले होते.
‘नको गोळ्या-औषधांची चिंता सारी, विदर्भाच्या रानभाज्या खूपच गुणकारी’, ‘रासायनिक फवारणीच्या कशाला खाता भाज्या? आहारात घेऊया नैसर्गिक रानभाज्या’, ‘पावसाळ्यातील रानभाज्या खाऊ आणि अनेक आजार पळवून लावू’ असा जनजागृतीपर संदेश या प्रदर्शनातून देण्यात आला.
पारंपरिक ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचावे
ऋतूमानानुसार रानभाज्या सहज उपलब्ध होत असतात. मधुमेह, पोटदुखी, कॅन्सर, खोकला आदींवर औषधी म्हणून तर काही वनस्पती गर्भवती आणि बालकांसाठी अतिशय उपयुक्त ठरल्या आहेत. भाज्यांचा रस्सा तयार करणे; भाजून, वरण, भाजी आदी खाद्यपदार्थ तयार केले जातात. या पारंपरिक अन्नाविषयीचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी हा उपक्रम राबविला.
– रामेश्वर बावनकर (उच्चश्रेणी मुख्याध्यापक- जि. प. शाळा भजेपार)



