– भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची टीका
मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी 31 हजार 628 कोटींचे ऐतिहासिक पॅकेज जाहीर केल्यानंतर खा. संजय राऊत आणि उबाठा गटाची मानसिक अस्वास्थ्यामुळे झोप उडली आहे. रात्री उशिरा डोळा लागून सकाळी उशिरा डोळे उघडत असल्याने कालपासून राऊत यांचा रोज सकाळी वाजणारा भोंगा आता दुपारी वाजायला लागला आहे असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी लगावला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक उपस्थित होते. कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. भाजपा महायुती सरकार आणि केंद्र सरकार यापुढेही शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे, असेही बन यांनी नमूद केले.
नवी मुंबई विमानतळ, मेट्रो यासारख्या प्रकल्पांचा पहिला प्रस्ताव उबाठा गटाने मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रसिद्धीचा हव्यास असल्याने या दोन्ही कामांचे फक्त फित कापून श्रेय लाटण्याचे काम केले असे म्हणणाऱ्या राऊतांच्या वैचारिक दिवाळखोरीची कीव येते या शब्दांत श्री बन यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदींची प्रसिद्धी ही त्यांच्या विकास कामांमुळे लाभ झालेली देशातील 140 कोटी जनता मुक्तकंठाने करत असते. प्रसिद्धीसाठी पंतप्रधान मोदींना सामनासारख्या रद्दी वर्तमानपत्राची गरज नाही असा सणसणीत प्रहार बन यांनी केला.
भूमिपूजनापासून उद्घाटनापर्यंतचा स्वप्नवत प्रवास शक्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वामुळे प्रकल्पाचे भूमिपूजन आणि लोकार्पण दोन्ही करणे हे दोघांचे वैशिष्ट्य बनले आहे. जे सर्वसमावेशक विकासाची कामे हाती घेतात त्यांना उद्घाटन करण्याचा पूर्ण अधिकार असतो. खासदार निधीतून राऊतांनी एखादे शौचालय अथवा एखादा रस्ता तरी बांधला का याचे उत्तर राऊतांनी आधी द्यावे आणि नंतर त्यांनी मोदी यांच्या कामाबद्दल बोलावे असे बन यांनी खडसावले.
काँग्रेसची स्वतःलाच भारतरत्न देण्याची परंपरा
स्वतःच्या हयातीत आपलेच नाव एखाद्या विकास प्रकल्पाला द्यायचे, आपण आपल्यालाच भारतरत्न घ्यायचा ही हीन परंपरा काँग्रेसची आहे असा प्रहार बन यांनी केला. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांनी बैठक घेतल्याचा आव आणत स्वत:लाच भारतरत्न देण्याची शिफारस केली आणि हा सर्वोच्च सन्मान पटकावला याचा उल्लेख बन यांनी केला. भाजपामध्ये लोकशाही परंपरा राखली जाते आणि लोकहिताचे कार्य केले जाते. लोकांमध्ये नारायण पाहण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केले जाते. राऊतांचे काम हे गाढव नाक्यावरच्या वराहासारखे आहे अशी बोचरी टीका बन यांनी केली.
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी भाजपाचीच होती आणि ती मागणी केंद्र सरकार पूर्ण करणार आहे यात शंका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणामध्ये दि.बा. पाटील यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढून त्यांच्या कामाची दखल घेतली आहे. पंतप्रधान मोदी यांचे नाव विमानतळाला देण्याचा हव्यास नाही. पंतप्रधान मोदींचे नाव 140 कोटी जनतेच्या हृदयावर कोरले आहे तर राऊत फक्त सामनाच्या रद्दीपुरते मर्यादित आहेत, असेही बन यांनी सांगितले.
गुंडांना पाठीशी घालणे उद्धव परंपरा, कायद्याचे पालन ही देवाभाऊंची ओळख!
सचिन वाझेवर कोण मेहरबान झाले होते, खंडणीचे आरोप झालेल्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घेताना कोणी विलंब लावला होता, असे सवाल करत बन यांनी अनिल परब यांना लक्ष्य केले. उबाठांच्या पक्षात किती गुंड आहेत, किती खंडणीखोर आहेत, कशा पद्धतीने खंडणीवसुली केली जाते हे प्रश्न परबांनी आधी उद्धव ठाकरेंना विचारावेत असे आव्हान श्री. बन यांनी दिले. भाजपा गुंडांना पाठीशी घालत नाही तर कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर कारवाई नक्की केली जाईल असा विश्वास बन यांनी व्यक्त केला.



