नागपूर :- आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या ‘आपली बस’ तर्फे शनिवार ११ ऑक्टोबर आणि रविवार १२ ऑक्टोबर रोजी विशेष बस वाहतूक उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश नागपूरकरांना सणाच्या काळात सुरळीत व सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे आहे. प्रवाशी आपली बस सेवेला उत्तम प्रतिसाद देत आहेत. नुकतेच आपली बस ने ६ ऑक्टोबर रोजी प्रवाशी संख्येत विक्रमी नोंद केली आहे. एकाच दिवशी १ लाख ८२ हजार,१४८ प्रवाश्यांनी प्रवास केला आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक राजेश भगत यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या विशेष उपक्रमानुसार शहरातील प्रमुख मार्गांवर बस सेवा सकाळी ०६:०० वाजल्यापासून रात्री ९:३० वाजेपर्यंत (२१:३० तास) सुरू राहील.
सणासुदीच्या काळात बाजारपेठा, मंदिरे आणि विविध ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा विचार करून ही व्यवस्था करण्यात आली आहे. ‘आपली बस’ व्यवस्थापनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सणाच्या दिवसांत खासगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब करावा, ज्यामुळे वाहतुकीवरील ताण कमी होईल आणि प्रदूषणातही घट होईल. प्रवासी ‘एनएमसी चलो’ मोबाइल अॅपच्या माध्यमातून बसचे वास्तविक-वेळेतील स्थान आणि वेळापत्रक पाहू शकतात तसेच डिजिटल पेमेंटचा वापर करून सोयीस्कर प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. या विशेष वाहतूक योजनेद्वारे ‘आपली बस’ नागपूरकरांसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवासाची आपली वचनबद्धता कायम ठेवत आहे.




