spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पत्रा चाळ लुटणाऱ्या संजय राऊतांनी प्रामाणिकतेच्या गप्पा मारू नये

– भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नक्षलवाद मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न होणार साकार

मुंबई :- संजय राऊत हे मिस्टर नटवरलाल आणि संपूर्ण उबाठा गट म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांचा कारखाना आहे अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्राचाळीमध्ये लोकांची घरे लुटण्याचे ज्यांनी पाप केले त्या राऊतांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. फडणवीस हे वकील आहेत त्यांची पदवी काय हे तपासण्याचा शहाजोगपणा राऊतांनी करू नये त्यापेक्षा स्वत:ची बुद्धी तपासून घ्यावी असा खोचक सल्ला श्री.बन यांनी दिला. जे स्वतः बेईमान आहेत, जे जामिनावर तुरुंगाच्या बाहेर आहेत त्यांनी बेईमान राजाबद्दल बोलू नये. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच नेतृत्व समर्थपणे केले असून त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. म्हणूनच भाजपाने सलग तीन वेळा विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवले.

उबाठा गट ही कोवीड काळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारी घोटाळेबाज टोळी आहे अशी प्रखर टीका बन यांनी केली. तुमच्या घोटाळ्यांची यादी बघितली तर शिशुपालाच्या 100 अपराधांचा घडा जसा भरला तसा आता उबाठा गटाच्या पापांचा घडा भरला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतरुपी हत्याराने सजग मतदार राऊतांचा उबाठा गट आणि मविआ चा पराभव करतील असा विश्वास बन यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे माओवाद, नक्षलवाद मुक्त भारताचे स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार महाराष्ट्रात सत्यात उतरवण्यासाठी दिवसरात्र एक करत आहे. गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळीतील जहाल नेता भूपतीसोबत त्याच्या 60 सहका-यांनी देवाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्यासमोर आत्मसमर्पण करत बंदुका सोडून हाती संविधान घेतले. देवाभाऊंच्या सक्षम नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या नक्षलवादी चळवळीतील ऐतिहासिक घटना घडली आणि लोकशाही आणि संविधानाचा मोठा विजय झाला असे बन यांनी नमूद केले. काँग्रेसच्या काळामध्ये गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत होती. नक्षली चळवळीच्या माध्यमातून अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता त्याचा बिमोड करून खऱ्या अर्थाने लोकशाहीसाठी आदर्श असलेली यंत्रणा गडचिरोलीमध्ये उभी करण्याची मोठी कामगिरी फडणवीस यांनी केली आहे. संविधान हातात घेऊन लढाई लढण्यासाठी, विकासाची साथ देण्यासाठी नक्षलवादी तयार झाले आहेत हे मोठे यश आहे.

राऊतांचा ‘अंतकाल’ सुरू — सर्वत्र भाजपा दिसतो

कंसाला जळी स्थळी, काष्ठी, पाषाणी केवळ श्रीकृष्ण दिसत होते तसे सध्या राऊतांचे झालेय, त्यांना सर्वत्र केवळ भाजपा आणि भाजपाचे नेते दिसतात. त्यांना न्यायालय, मतदार आणि आता निवडणूक आयोगामध्येही भाजपाची माणसे दिसू लागली आहेत, हा बौद्धिक दिवाळखोरीचा अतिरेक आहे असे बन म्हणाले. श्रीकृष्णाच्या पाठिशी जनता होती तसाच आज जनतेचा आशीर्वाद भाजपाच्या आणि फडणवीस यांच्या पाठीशी आहे. त्यामुळेच असत्याचा अंत अटळ आहे.

मुंबईचा महापौर महायुतीचाच !

महायुती म्हणजे विश्वासाचे समीकरण आहे. एका फुटकळ बॅनरमुळे महायुती तुटणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या तिघांचा मार्ग, दिशा एकच असून विजय हे एकच लक्ष्य आहे अशी स्पष्ट भूमिका बन यांनी मांडली. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सर्वत्र महायुतीचा झेंडा फडकावण्यासाठी तिन्ही पक्ष समन्वयाने काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. सर्वत्र महापौर महायुतीचाच होणार असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.