खसाळा ग्रामपंचायतीच्या विकास पर्वाची डिजिटल सुरुवात

0
45

– पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

– खसाळा गाव ठरतंय ‘डिजिटल आणि आदर्श ग्रामपंचायत’चं मॉडेल

कामठी :- तालुक्यातील खसाळा गावात रविवारी एक ऐतिहासिक सोहळा पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. या निमित्ताने खसाळा ग्रामपंचायतीच्या “डिजिटल विकास पर्वा”चा शुभारंभ झाला.

सरपंच जयश्री इंगोले आणि ग्रामपंचायतीच्या टीमने संपूर्ण ग्रामविकासाला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार या सोहळ्यात केला.

पालकमंत्री बावनकुळे यांनी आपल्या भाषणात खसाळा ग्रामपंचायतीचे अभिनंदन करताना म्हटलं की,गावाच्या विकासात लोकसहभाग हीच खरी शक्ती आहे. जयश्री इंगोले यांनी तो लोकसहभाग जपला आणि 18 विविध प्रमाणपत्रे मिळवून खसाळा ग्रामपंचायतीने नागपूर जिल्ह्याचा एक विक्रम प्रस्थापित केला आहे.

ते पुढे म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, गावावरून देशाची परीक्षा होते. गाव समृद्ध असेल तर देशही विकसित होतो. 2047 चा ‘विकसित भारत’ आणि ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला जोडणारे हे डिजिटल खसाळा आता सर्वांसाठी आदर्श ठरणार आहे.

 ‘डिजिटल ग्राम’चा नमुना

खसाळा ग्रामपंचायतीने 100 टक्के घरांचे जिओ-टॅगिंग, ग्रामपंचायत संगणकीकरण, ओला-सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन, स्मार्ट क्लास, वाचनालय, आणि स्वच्छता उपक्रम यांसारख्या नाविन्यपूर्ण योजना राबवल्या आहेत. यामुळे ग्रामविकासात पारदर्शकता आणि जबाबदारीची नवी दिशा मिळाली आहे.

महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय

महिला बचतगटांसाठी ‘लाडकी बहीण योजना’ आणि ‘मिशन शक्ती उद्योगिनी योजना’ अंतर्गत प्रत्येकी एक लाख रुपयांचे फिरते भांडवल देण्याचा निर्णय जाहीर करत बावनकुळे म्हणाले, पुढील पाच वर्षांत 10,000 महिला बचतगटांना आम्ही आर्थिक पाठबळ देणार आहोत. महिला उद्योजकतेचा हा दीप खसाळा गावातून उजळावा अशी माझी अपेक्षा आहे.

सौर ऊर्जेचा नवा उपक्रम

पालकमंत्र्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांसाठी सौर ऊर्जा योजना लागू करण्याची घोषणा केली.

100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या घरांना सोलर पॅनल बसवून देण्यात येईल. त्यामुळे पुढील 15 वर्षे त्यांना विजेचं बिल माफ होईल, असे ते म्हणाले.

गावागावांत पोहोचणारा विकास

बावनकुळे यांनी सांगितले की, जिल्हा विकास निधीचा आकार 220 कोटींपासून वाढवून 1200 कोटी रुपये करण्यात आला आहे.

खसाळा ग्रामपंचायतीसारख्या आदर्श गावांना निधी देण्यात प्राधान्य दिलं जाईल,” असे त्यांनी नमूद केलं.

शेवटी त्यांनी जयश्री इंगोले यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायतीला 50 लाख रुपयांचा विशेष विकास निधी जाहीर केला.

त्याचबरोबर खसाळा गावाला “महाराष्ट्रातील क्रमांक एकचं डिजिटल आणि आदर्श गाव बनवण्याचं” लक्ष्य ठरवण्यात आलं.

खसाळा गावाची ही डिजिटल झेप ग्रामीण भारताच्या नव्या वाटचालीची दिशा दाखवणारी ठरत आहे.

लोकसहभाग, पारदर्शकता आणि नेतृत्वाची जिद्द या तिन्ही गोष्टींवर उभं राहिलेलं खसाळा आता ‘विकसित ग्राम, विकसित भारत’ या स्वप्नाचा नवा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

या प्रसंगी सरपंच सौ. जयश्री इंगोले यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य आहे. पारदर्शक प्रशासन, तत्पर सेवा व लोकसहभाग हेच आमचे ध्येय आहे. डिजिटल ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घटकाशी थेट संवाद साधणे शक्य झाले आहे.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाने, ग्रामीण पाणी पुरवठा स्वच्छता विभाग जिल्हा परिषद, नागपूरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल उंदीरवाडे, उपविभागीय अधिकारी संजय पवार , तहसीलदार गणेश जगदाळे,  महाजेनको चे मुख्य अभियंता विलास एस मोटघरे, जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कपिलनाथ कलोडे, पं.स. कामठीचे खंड विकास अधिकारी बाळासाहेव येवले आदी सह अनेक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.