– आरोग्य सुविधेची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी देवेंद्र भुयार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना साकडे !
वरूड :- मोर्शी वरूड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार यांनी त्यांच्या ५ वर्षाच्या कार्यकाळामध्ये जनतेसाठी सेवेसाठी आरोग्य यंत्रणा प्राधान्याने निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे मोर्शी वरूड तालुक्यातील जनतेसाठी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून मोर्शी विधानसभेमध्ये कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी खेचून आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे मंजूर करून घेतली.
मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोर्शी विधानसभा मतदार संघातील जनतेने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर कृपा करून भरघोस मतांनी निवडून दिले तरीही सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी विशेष प्रयत्न करून मंजूर करून आणलेले वरुड येथील अतिरिक्त १०० बेड रुग्णालय ५० कोटी रुपये, राजुरा बाजार येथील ३० बेड रुग्णालय ५० कोटी रुपये, मोर्शी येथील ट्रामा केयर हॉस्पिटल १५ कोटी रुपये, बेनोडा ट्रामा केयर हॉस्पिटल १५ कोटी रुपये, मोर्शी शहरातील प्रमुख रस्ते निधी ८५ कोटी रुपये, शे घाट शहरातील प्रमुख रस्ते निधी ५० कोटी रुपये, वरुड, मोर्शी, शेघाट येथील निधी १५ कोटी रुपये, अल्पसंख्याक निधी १० कोटी रुपये अशी सर्व २९० कोटी रुपयांची जनहिताची कामे आमदार उमेश यावलकर यांनी रद्द केल्याचा आरोप माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी केला.
मोर्शी विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या सोईसाठी मंजूर करून आणलेले उपजिल्हा रुग्णालय मोर्शी, वरूड येथे नवीन ट्रॉमा केअर युनिट, वरुड, मोर्शी, तालुक्यातील नवीन प्राथमिक तसेच उप आरोग्य केंद्रे, उप जिल्हा रुग्णालयांना मंजुरी देण्याबरोबरच, रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे गरजेचे असताना २९ मे रोजी शासन निर्णय काढून आरोग्य विभागाची मंजूर कामे रद्द केल्यामुळे मोर्शी विधानसभा मतदार संघातील नागरिकांवर अन्याय होणार असल्याची बाब माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली असून मोर्शी विधानसभ मतदार संघात रुग्णालयांना वैद्यकीय चाचणी आणि अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी मोर्शी मतदार संघातील रद्द करण्यात आलेली २९० कोटी रुपयांची कामे पूर्ववत मंजूर करून अधिवेशनामध्ये तशी घोषणा करून मोर्शी वरूड तालुक्यातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.








