नागपूर, ता. १४ : नागपूर शहरातील वस्त्यांमधील लहान नाल्यांची सफाई करण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नशील आहे. यादृष्टीने कोराडी मार्गावरील बाबा फरीदनगर नाला आणि गड्डीगोदाम येथील शक्ती नाल्याची या स्पायडर मशीनद्वारे सफाईची चाचणी सोमवारी (ता.१४) पार पडली. या चाचणीची पाहणी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली. त्यांनी स्पायडर मशीनची कार्यक्षमता तपासली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, उपायुक्त राजेश भगत, उपायुक्त अशोक गराटे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले मुख्यालयातील झोनल अधिकारी लोकेश बासनवार, मंगळवारी झोनचे झोनल अधिकारी प्रमोद आत्राम, भूषण गजभिये, ठाकूर देसाई उपस्थित होते.
लहान नाल्याची सफाई करण्यासाठी ‘स्पायडर मशीन’ उपयोगात आणली जाते. नाल्यात जास्त पाणी असताना देखील स्वच्छता करता यावी यासाठी ‘स्पायडर मशीन’ला चार पायची व्यवस्था आहे. त्याद्वारे मशीन खोल पाण्यात उभी राहू शकते. तसेच त्यामुळे लहान नाल्यात जाऊन स्वच्छतेचे कार्य करता येते. स्पायडर मशीन ३६० अंशामध्ये पूर्ण गोल फिरू शकत असल्यामुळे चारही दिशेने फिरवता येते. विशेष म्हणजे अशी सुविधा इतर मशीनमध्ये उपलब्ध नाही.




