spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत वीरशी शाळेचे घवघवीत यश

किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील निमखेडा केंद्रांतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, निमखेडा येथे नुकत्याच उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये केंद्रातील एकूण १३ शाळांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वीरशी येथील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा व सांस्कृतिक प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा नावलौकिक वाढविला.

स्पर्धेत वरिष्ठ गटातील मुले व मुली कबड्डी, रिले रेस, खो-खो, लंगडी तसेच सांघिक लोकनृत्य व समूहगीत गायन या प्रकारांत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. कनिष्ठ गटातही मुले व मुली कबड्डी, खो-खो, लंगडी, उंच उडी, लांब उडी, बुद्धिबळ, वेशभूषा, नक्कल, वक्तृत्व व धावणे या स्पर्धांमध्ये चमकदार यश संपादन केले.

उंच उडीत देवांश सोनवणे व काजल मारवडे, लांब उडीत साहिल मेश्राम व सोनाली टेकाम, बुद्धिबळ स्पर्धेत देवांश सोनवणे, वेशभूषा स्पर्धेत आराध्य सोनवणे, नक्कल स्पर्धेत सोनाली टेकाम, वक्तृत्वात नक्ष पारेकर यांनी विशेष यश मिळविले. १०० मीटर धावण्यात कनिष्ठ गटात मोहित नन्नावरे व प्रांजली खुरपुडे, तर वरिष्ठ २०० मीटर धावण्यात देवांश सोनवणे व सोनाली टेकाम यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

कुस्ती स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. २४ किलो वजनी गटात ओम मारवडे व सोनम शेंदरे, २८ किलो गटात प्रिन्स उईके व शिवानी ठाकरे, ३० किलो गटात माधव सोनवणे व आराध्या सोनवणे, तसेच ३२ किलो गटात पंखुडी मडावी यांनी यश संपादन करून शाळेचा गौरव वाढविला. एकूण ३५ खेळ प्रकारांपैकी तब्बल ३२ खेळ प्रकारांत वीरशी शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे.

या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक गौतम गणवीर, पदवीधर शिक्षक नितीन कदम, सहाय्यक शिक्षक अन्नपूर्णा वंजारी व मनोज भगत तसेच केंद्रप्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी भक्तवर्ती यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भारत सोनवणे व सर्व सदस्य, तसेच सरपंच सौ. लक्ष्मी चौधरी, उपसरपंच पंकज वाणी, मते, ग्रामपंचायत सदस्य व पालकवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करून त्यांना तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

वीरशी शाळेच्या या दैदीप्यमान यशामुळे संपूर्ण परिसरात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Popular Articles