खापा :- खापा शहरात दहशत निर्माण केलेल्या सांड्याचा शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी २५ डिसेंबर गुरुवारला मध्यरात्री रेस्क्यू करून त्याला गौशाळेत दाखल केले. सदर सांड्यामुळे शहरातील सर्व नागरिक त्रस्त होते. मागील काही दिवसापूर्वी त्याने एका व्यक्तीला चांगली धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे काही दिवसात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अशाच प्रकारे मागील काळामध्ये या नंदीबैलाने अनेकांना जखमी केले. तर यामुळे शहरात वेगवेगळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कोणत्याही कार्यासाठी तत्पर असलेले सामाजिक कार्यकर्ते मकसूद शेख, सचिन तुमाने, धनराज खुबाळकर, आतिश खुबाळकर यांच्या पुढाकाराने या सांड्याला रेस्क्यू करण्यात यश आले. सदर नंदीबैलाला प्रथमतः बँक ऑफ बडोदा चौकात पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याने रेस्क्यू करणाऱ्या सर्वांची चांगलीच दमछाक केली. भवानी माता मंदिर चौक, बाजार चौक, वाडा, कुंभारपुरा, कृष्णाजी महाराज मठ, बुरडे मोहल्ला, नेताजी शाळा हे सर्व संपूर्ण परिसर रात्री गाजवून काढले. अखेर त्याला बाजार चौक जवळील वाडा येथील निंबाच्या झाडाजवळ चांगलीच मेहनत करत पकडण्यात यश आले. त्या नंदीला पकडून चारचाकी वाहनाद्वारे अंजली वैदवार यांच्याद्वारा संचालित ताराबोळी येथील गोशाळेत मध्यरात्रीच सुरक्षितरित्या सोडण्यात आले. या केलेल्या कामगिरीची सर्व स्तरावरून नागरिकांद्वारे सामाजिक कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. या सांड्याला पकडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मकसूद शेख, धनराज खुबाळकर, सचिन तुमाने, आतिश खुबाळकर, सईद कुरेशी, अहेफाज कुरेशी, अश्फाक कुरेशी, रमजान कुरेशी, वसिम (गोलू ) शेख, गौरव मानापुरे, कुणाल येणुरकर, विक्की कावनपुरे, सारंग कवडे यांनी चांगलीच मेहनत घेतली.
“कोंडवाड्याचा मोठा प्रश्न? नगरपालिका प्रशासन सुस्त”
खापा शहरातील भटके, मोकाट जनावरांसाठी एकही कोंडवाडा नाही. यापूर्वी गडेगाव रोडवर एक वाडा होता. तो कालांतराने जमीनदोस्त झाला. त्यानंतर नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आजपर्यंत नवीन कोंडवाडा बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे मोकाट, भटके जनावरे शहराला लागून असलेल्या शेतमालाचाही नुकसान करतात. त्यामुळे शहरातील सर्व शेतकऱ्यांना मोकाट जनावरांचा त्रास सहन करावा लागतो. तसेच शहरात विविध परिसरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी नवनियुक्त नगराध्यक्ष नगरसेवक यांच्यापुढे या जनावरांपासून होणाऱ्या त्रासापासून शरीरातील नागरिकांना मुक्त करतील काय? असा मोठा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
“भटक्या कुत्र्यांचा त्रास”
तसेच भटक्या कुत्र्यांपासून त्यांच्या त्रासापासून शहरातील नागरिक त्रस्त झालेले आहे. शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर खूप वाढलेला आहे. भटके कुत्रे भर दिवसा कोणावरही चवतारतात त्यामुळे लहान मुलांना बाहेर खेळण्यास आणि फिरण्यास खूप त्रास सहन करावा लागत आहे. रात्री हे कुत्रे खूप भुंकतात त्यामुळे नागरिकांची झोपमोड होत असल्याने शहरातील नागरीक त्रस्त झाले आहेत. नुकतेच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेले नवनियुक्त नगराध्यक्ष, नगरसेवक काय उपाय योजना करतील. याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.




