spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

14 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

यवतमाळ :- राष्ट्रीय व राज्य विधीसेवा प्राधिकरणाच्या निर्देशान्वये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष शेखर मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.14 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व न्यालयांमध्ये ही लोकअदालत होणार आहे. पक्षकारांनी आपली प्रलंबित व दाखलपुर्व जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडीसाठी ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे..

सदर राष्ट्रीय लोकअदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तकार निवारण मंच आणि इतर सर्व न्यायालये तसेच न्यायाधिकरणे येथे होणार आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई, भुअर्जन मामले, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघणार आहे. लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याकरीता न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ पक्षकारांस मदत करतील.

लोकअदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. लोकअदालतीच्या निवाड्याविरूध्द अपील नसल्याने वाद कायमचा मिटतो. न्यायालयाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोकअदालतीमध्ये होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते. खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलट तपासणी, दिर्घ युक्तीवाद याबाबी टाळल्या जातात. वाद मिटविल्याने वेळ व पैशाची बचत होते. तसेच प्रकरण न्यायालयात चालविण्या करीता होणाऱ्या त्रासातुन सुटका होते व त्वरीत आपसी संमतीने न्याय मिळतो.

पक्षकारांनी आपली प्रकरणे दि. 14 मार्च रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्याकरीता प्रलंबित प्रकरणांसाठी संबंधित न्यायालयात अर्ज सादर करावा आणि दाखलपूर्व प्रकरणांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधून जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव दिपक दाभाडे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.