– विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन; तांत्रिक तपासातून शोधलेले मोबाईल नागरिकांना केले परत
हंसराज प्रतिनिधी भंडारा :- महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त २ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत राज्यभर ‘पोलीस रेझिंग डे’ सप्ताह साजरा केला जात आहे. भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित या सप्ताहाचा औपचारिक उद्घाटन सोहळा आज, ७ जानेवारी रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी सावन कुमार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि मंत्री महोदय उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सप्ताहातील विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.
पोलीस आणि नागरिक यांच्यातील सलोखा वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.
स्पर्धा परीक्षा आणि आरोग्य विषयावर मार्गदर्शन
या सप्ताहाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष सत्र. यामध्ये तुमसरचे सहायक पोलीस अधीक्षक मयंक माधव यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षेची रणनीती आणि यशाची सूत्रे मांडली. उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांनी एमपीएससी (MPSC) परीक्षेच्या स्वरूपाबद्दल सविस्तर माहिती दिली.

ग्रामीण स्तरावरील पोलीस पाटलांना उपविभागीय पोलीस अधिकारी काळे आणि पोलीस निरीक्षक भुसारी यांनी कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले. आरोग्य व प्रबोधन सत्रात डॉ. हसन यांनी आरोग्य विषयक जनजागृती केली. तसेच अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या पत्नी आणि ‘न डॉक्टर न दवा, बस सही स्वास’ या पुस्तकाच्या लेखिका अंजली मोरे यांनी विशेष व्याख्यान दिले.
हरवलेले मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द
भंडारा पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे शोधून काढलेले नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन मान्यवरांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले. आपला हरवलेला ठेवा पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले. या सप्ताहादरम्यान आयोजित प्रदर्शनाला जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट दिली.
पत्रकार दिनानिमित्त माध्यम प्रतिनिधींचा गौरव
सायंकाळच्या विशेष सत्रात ‘पत्रकार दिना’चे औचित्य साधून पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या काही तातडीच्या कामामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत पोलीस अधीक्षकांच्या पत्नी (प्रतिनिधी म्हणून) त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. समाजाचा आरसा असलेल्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. भंडारा पोलिसांनी राबवलेल्या या बहुआयामी उपक्रमामुळे तरुणांना नवी दिशा मिळाली असून, जनतेमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल सकारात्मक संदेश गेला आहे.








