– उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ प्रथम पुरस्कार प्राप्त.
हंसराज प्रतिनिधी भंडारा :- राज्य शासनाच्या वतीने आयोजित उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा–2025 चा निकाल जाहीर झाला असून जिल्हास्तरावर सन्मित्र गणेशोत्सव मंडळ, गणेशपूर या मंडळाने उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ म्हणून प्रथम पुरस्कार पटकावून जिल्ह्यात मानाचा लौकिक मिळविला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे समन्वयक सावन कुमार यांच्या हस्ते विजेत्या मंडळांचा सन्मान करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष मनोहर चव्हान, जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हास्तरीय निवड समितीच्या सदस्य सचिव तारकेश्वरी बोरीगिड्ढे उपस्थित होते.
सन्मित्र गणेशोत्सव मंडळ, गणेशपूर या मंडळाला जिल्हास्तरावर प्रथम पुरस्काराचे पारितोषिक प्राप्त झाले असून पुरस्कार स्वरूपात 50 हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. सदर पारितोषिक सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आले. ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या मार्फत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या आधारे सहभाग नोंदविला होता.
विजेत्या मंडळांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले असून बक्षिसाची रक्कम थेट मंडळांच्या खात्यावर RTGS द्वारे वितरित करण्यात आली आहे. कार्यक्रमास सहायक जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप दातीर, सहायक संशोधन अधिकारी पंकजा भोंगाडे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








