किशोर साहू, मौदा ता.८ :- जिल्हा परिषद हायस्कूल कोदामेंढी येथे शनिवार ( दि. ३ जानेवारी ) ला स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक सी. एस. शिवणकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. काही विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ओघवती भाषणे दिली, तर काहींनी त्यांच्या संघर्षाची गाथा सांगणारी गीते आणि नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सावित्रीबाईंनी खडतर परिस्थितीत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ कशी रोवली, हा संदेश या माध्यमातून देण्यात आला.




