spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य प्रयोगशाळेचे उद्घाटन

– रोगनिदान व सार्वजनिक आरोग्य देखरेख अधिक सक्षम; दुर्गम भागांतील नागरिकांना दर्जेदार तपासणीची सुविधा

गडचिरोली :- सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे नवनिर्मित एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा (इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी ) चे उद्घाटन गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून रोगनिदान, आजारांची देखरेख व प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मोठे बळ मिळणार आहे.

या प्रयोगशाळेमुळे संसर्गजन्य आजारांची तपासणी, पाणी व अन्ननमुने विश्लेषण, पर्यावरणीय नमुन्यांची चाचणी तसेच विविध जैविक तपासण्या एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. परिणामी आजारांचे लवकर व अचूक निदान होऊन वेळेत उपचार सुरू करता येणार असून संभाव्य साथरोगांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

उद्घाटनप्रसंगी उद्घाटक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा एस. लहाडे, यांनी ही इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा नेटवर्क अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाची पायरी असल्याचे नमूद केले. या सुविधेमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनाही दर्जेदार, विश्वसनीय व अचूक तपासणी सेवा उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अविनाश टेकाडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली तसेच डॉ. नितीन टिपले, वरिष्ठ प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी सामान्य रुग्णालयातील डॉ. सचिन करंजेकर, शरीरविकृती शास्त्रज्ञ (वर्ग–१), डॉ. मुकुंद ढबाले, शरीरविकृती शास्त्रज्ञ यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय प्राध्यापक, सहाय्यक व सहयोगी प्राध्यापक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत या प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी, वेगवान व लोकाभिमुख होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Popular Articles