नागपूर, १७ : शेतकऱ्यांना दिवसा खात्रीशीर आणि परवडणारी वीज उपलब्ध करून देण्यासाठी तसेच राज्याच्या ऊर्जा सुरक्षेत सौर ऊर्जेचा वाटा वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0” च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन झालेल्या नागपूर जिल्हा टास्क फोर्सची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या योजनेचा मुख्य उद्देश 2025 पर्यंत किमान 30 टक्के कृषी वीज वाहिन्यांचे सौरऊर्जेवर रूपांतर करणे हा आहे, ज्यासाठी सुमारे 16 हजार मेगावॉट सौर ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. डॉ. इटनकर यांनी बैठकीत योजनेच्या जलद आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी विविध पैलूंवर सखोल चर्चा केली. यामध्ये सौर प्रकल्पांची कार्यक्षम व वेळेत अंमलबजावणी, तांत्रिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि वन विभागाशी संबंधित अडचणी दूर करणे, तसेच सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी आवश्यक जमिनीची उपलब्धता सुलभ करणे यावर भर दिला गेला. खासगी जमीन मालकांना वार्षिक भाडेपट्ट्याद्वारे प्रोत्साहन देण्याबाबतही चर्चा झाली.
वन विभागाकडून वृक्षतोड आणि वाहतूक परवानग्या त्वरित मिळवण्यासाठी मानक कार्यप्रणाली लागू करणे, प्रकल्पांसाठी आवश्यक परवानग्या एकाच ठिकाणी मिळणे, कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा झाल्याने महावितरणवरील सबसिडीचा भार कमी करून राज्याच्या ऊर्जा क्षेत्राची आर्थिक स्थिरता वाढवणे, तसेच ग्रामीण भागात सौर ऊर्जा संबंधित कौशल्ये विकसित करून नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे यासारख्या महत्त्वाच्या विषयांचाही आढावा घेण्यात आला.
या बैठकीला महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, नागपूर ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता नारायण लोखंडे यांच्यासह योजनेत सहभागी कंत्राटदार उपस्थित होते.




