किशोर साहू: मौदा, ता, १७ : ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण व होतकरू विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकसित करण्यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धामणगाव येथे आजनगाव केंद्रांतर्गत एक दिवसीय नवोदय परीक्षा उदबोधन वर्ग कार्यशाळा बुधवार (दि.16 जुलै)ला प्रभावीपणे पार पडली. या कार्यशाळेचे आयोजन केंद्राच्या केंद्रप्रमुख डॉ. शिल्पा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यशाळेचा प्रारंभ कार्यक्रमाच्या उद्घाटिका तथा गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मौदा चिनकुरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व वृक्ष पूजनाने झाला. प्रमुख मार्गदर्शक स.शि. जि प उ प्रा शा रुयाड,पं.स.कुही येथील भाऊराव जीभकाटे , शिक्षण विस्तार अधिकारी पं.स.मौदा, संकेत मरस्कोल्हे , नवोदय परीक्षा मार्गदर्शक रुपेश गवळी यांचे कार्यशाळेला मार्गदर्शन लाभले .प्रमुख पाहुणे म्हणून नवनीत पब्लिकेशन नागपुर येथील विशाल पांडे ,निलेश भजने यांची विशेष उपस्थिती होती
कार्यशाळेत जिभकाटे यांनी विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेची संपूर्ण माहिती, अभ्यासाची योग्य दिशा, वेळेचे व्यवस्थापन, तसेच यशस्वी होण्यासाठी लागणारे मूलभूत गुण याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. सहाय्यक शिक्षक जीवकाटे यांचे विद्यार्थी दरवर्षी नवोदय परीक्षा धारक होत असल्याने गटशिक्षणाधिकारी चिनकुरे यांनी जिभकाटे यांच्या केंद्राच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
शिक्षण विस्तार अधिकारी मरसकोल्हे सरांनी मानसिक क्षमता चाचणी या विषयाला हात घालून यातील घटकांबद्दल विद्यार्थ्यांना पीपीटी द्वारे सखोल अशी माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही यात सक्रिय सहभाग घेतला आणि आपले शंका समाधान करून घेतले. रुपेश गवळी यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ऑनलाइन जवाहर नवोदय विद्यालयाची प्रत्यक्ष ओळख करून दिली. गणित विषयाचा परिचय व परीक्षेत गणित सोडविण्याच्या ट्रिक्स समजावून दिल्या.
कार्यशाळेमध्ये अभ्यासाचे नियोजन, सराव प्रश्नपत्रिका तसेच मार्गदर्शनपर तंत्र यावर विशेष भर देण्यात आला. या कार्यशाळेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवोदय परीक्षेबाबत आत्मविश्वास वाढला असून कार्यशाळेला उपस्थित शिक्षक व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. नवोदय परीक्षा उदबोधन वर्ग कार्यशाळेला केंद्रातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी, शिक्षक, पालक, केंद्रप्रमुख अरविंद भिवगडे, अनिल पत्रे , रामेश्वर भक्तवर्ती ,साधन व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्रातील नवोदय परीक्षा पात्र विद्यार्थी व शिक्षकांना योग्य मार्गदर्शन व प्रेरणा लाभावी या उद्देशाने नवोदय परीक्षा उद्बोधन वर्ग कार्यशाळा आयोजना मागचा हेतू प्रास्ताविकेतून केंद्रप्रमुख डॉ. शिल्पा सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद खोब्रागडे यांनी तर आभार प्रदीप हजारे यांनी मानले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी जि.प.उ.प्रा.शाळा धामणगाव शाळेच्या मुख्याध्यापिका करंडे, जयश्री दाढे , भाविका बसुटिया, ज्योती नांदगावे यांनी अनमोल सहकार्य केले.




