Friday, January 23, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रतिमा अभंगे यांची चित्रे भारतीय संस्कृतीचा आरसा – निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला

नवी दिल्ली :- जेव्हा एखाद्या कलाकाराची नाळ मातीशी जोडलेली असते तेव्हाच त्याच्या कलाकृतीला वैश्विक परिमाण प्राप्त होते. प्रतिमा अभंगे यांच्या चित्रांमध्ये दिसणारा भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा संगम थक्क करणारा असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी केले.

नवी दिल्लीतील प्रतिष्ठित ललित कला अकादमी येथे आयोजित प्रतिमा अभंगे यांच्या ‘पूराकल्प’ या एकल कला प्रदर्शनाला आर. विमला यांनी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्येक कलाकृतीचे बारकाईने निरीक्षण केले आणि संवाद साधला.

कलाकार जेव्हा आपल्या सांस्कृतिक परंपरेशी आणि मुळांशी निष्ठेने जोडलेला असतो, तेव्हा त्याच्या कलाकृतींना वैश्विक उंची प्राप्त होते. प्रतिमा अभंगे यांच्या चित्रांत दिसणारा भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल आविष्कार आणि संस्कृतीचा सुंदर मेळ हा खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे. त्यांची प्रत्येक कलाकृती भारतीय वारशाचे जिवंत प्रतिबिंब असल्याची जाणीव या प्रदर्शनातून प्रकर्षाने जाणवते,अशी भावना महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी व्यक्त केली.

या प्रदर्शनाला महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवास आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे यांनी भेट दिली असून दिल्लीतील कलाप्रेमी, ज्येष्ठ कलाकार आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभत आहे. यापूर्वी या प्रदर्शनाचे उद्घाटन इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती मुग्धा सिन्हा यांच्या हस्ते पार पडले होते. मुग्धा सिन्हा यांनीही “प्रयोगाचे धाडस हीच कलेची खरी ओळख” असल्याचे सांगत प्रतिमा यांच्या प्रवासाचा गौरव केला होता. ही प्रदर्शनी 25 जानेवारी पर्यंत सुरू असणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com