– १८ देशांतील कंपन्यांचा समावेश; ३० लाख कोटींचे करार प्रत्यक्षात, १० लाख कोटींचे काम अंतिम टप्प्यात
हंसराज, प्रतिनिधी भंडारा दावोस :- स्वित्झर्लंडमधील दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत (WEF) महाराष्ट्र सरकारने गुंतवणुकीचा नवा इतिहास रचला आहे. राज्याच्या विविध क्षेत्रांच्या विकासासाठी तब्बल ४० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले असून, यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणुकीचे जागतिक केंद्र म्हणून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ४० लाख कोटींपैकी ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार प्रत्यक्षात स्वाक्षरीत झाले आहेत. उर्वरित १० लाख कोटींच्या गुंतवणुकीबाबत प्राथमिक स्तरावरील चर्चा पूर्ण झाली असून, पुढील एक-दोन महिन्यांत या करारांवरही शिक्कामोर्तब होईल. या गुंतवणुकीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे.
या गुंतवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जगातील १८ प्रगत देशांमधील नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. अमेरिका, ब्रिटन (UK), स्वीडन, जपान, इटली, जर्मनी, फ्रान्स, युएई, डेनमार्क, फिनलंड, नॉर्वे आणि सिंगापूर यांसारख्या देशांनी महाराष्ट्रात उद्योग उभारण्यास पसंती दर्शवली आहे.
“मुंबईतील कंपन्यांसोबतच दावोसमध्ये जाऊन करार केले जात आहेत,” या विरोधकांच्या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, “महाराष्ट्राचे यश ज्यांना पाहावत नाही, अशा लोकांनी एक ‘पेड टूलकिट’ तयार केले आहे. त्याद्वारे सोशल मीडियावर संभ्रम पसरवला जात आहे. परंतु, यातील बहुतांश गुंतवणूक ही परकीय आहे.”
लोढा ग्रुपसोबत झालेल्या कराराबाबत स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले, “अभिषेक लोढा हे देशातील मोठे उद्योजक आहेत. त्यांनी डेटा सेंटरसाठी केलेल्या करारात ८० टक्के परकीय गुंतवणूक असून लोढा यांची गुंतवणूक केवळ २० टक्के जमिनीच्या स्वरूपात आहे. जगातील ४ मोठ्या कंपन्या या प्रकल्पात सहभागी आहेत. यामुळे मुंबई शहर डेटा सेंटरच्या जागतिक नकाशावर पहिल्या क्रमांकावर येईल.”
या विक्रमी गुंतवणुकीमुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार असून, आधुनिक पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र आघाडी घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. ही पत्रकार परिषद झूम मीटिंगच्या (Zoom Meeting) माध्यमातून दावोसवरून थेट आयोजित करण्यात आली होती.