नागपूर, ता. १८ : सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागेवर विनापरवानगी बांधकाम साहित्य ठेवणाऱ्या २३२ बिल्डरांवर गेल्या सहा महिन्यात महानगरपालिकेने कारवाई केली आहे. बांधकाम साहित्य रस्त्यांवर ठेवणाऱ्या बिल्डर व इतर नागरिकांकडून महानगरपालिकेने १ कोटी १६ लाख ३६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
बांधकाम व पाडकाम केल्यानंतर बांधकाम साहित्य तसेच मलबा रस्त्यावर ४८ तासापेक्षा अधिक काळ ठेवणाऱ्यावर महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात येते. यासंदर्भात पहिल्यांदा संबंधित व्यक्तीला महानगरपालिकेतर्फे नोटीस देण्यात येते. या नोटीसनंतरही बांधकाम साहित्य किंवा मलबा न उचलल्यास महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात येते.
गेल्या १ जानेवारी २०२५ ते ३० जून २०२५ या काळात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात नागपूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हे काम झोननिहाय करण्यात येत आहे. रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणाऱ्या बिल्डरांवर १० हजार रुपये तर इतर नागरिकांवर २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो. महानगरपालिकेने गेल्या सहा महिन्यात शहरातील २३२ बिल्डरांवर कारवाई करून २३ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक ६९ बिल्डरांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ६ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनमधील ४५ बिल्डरांवर कारवाई करून ४ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. धंतोली झोनमधील ३३ बिल्डरांकडून ३ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
४६५८ जणांवर कारवाई
याच काळात शहरातील विविध ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवणाऱ्या ४६५८ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. या नागरिकांकडून ९३ लाख १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात लक्ष्मीनगर झोनमधील सर्वाधिक ९३९ लोकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १८ लाख ७८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यानंतर सर्वाधिक कारवाई सतरंजीपुरा झोनमधील ६३० नागरिकांकडून १२ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आशीनगर झोनमधील ५८७ नागरिकांकडून ११ लाख ७४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
गेल्या सहा महिन्यात बिल्डरांवर झोननिहाय करण्यात आलेली कारवाई व कंसात दंडाची रक्कम रुपयांमध्ये
| झोन | झोननिहाय कारवाई | वसूल केलेल्या दंडाची रक्कम |
| १. लक्ष्मी नगर | ६९ | ६ लाख ९० हजार |
| २. धरमपेठ | ४५ | ४ लाख ५० हजार |
| ३. हनुमान नगर | २५ | २ लाख ५० हजार |
| ४. धंतोली | ३३ | ३ लाख ३० हजार |
| ५. नेहरूनगर | ८ | ८० हजार |
| ६. गांधीबाग | ५ | ५० हजार |
| ७. सतरंजीपुरा | ८ | ८० हजार |
| ८. लकडगंज | ५ | ५० हजार |
| ९. आशीनगर | २ | २० हजार |
| १०. मंगळवारी | ३२ | ३ लाख २० हजार |



