वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांची आमदार राजकुमार बडोले यांनी घेतली सांत्वनपर भेट

0
47

यासीन शेख, गोंदिया :- अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सडक / अर्जुनी तालुक्यातील मौजा माहुली येथील रहिवासी लक्ष्मी हेमराज सयाम यांचा काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, संपूर्ण गावावर दुःखाचे सावट पसरले आहे.

या घटनेची माहिती मिळताच आमदार राजकुमार बडोले यांनी मृतक महिलेच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत दुःखातून सावरण्याचे बळ दिले तसेच शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

आमदार बडोले यांनी प्रशासनाला तात्काळ मदत, नुकसानभरपाई व शासकीय योजनांचा लाभ देण्याचे निर्देश दिले. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी गावात आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

वनविभाग व महसूल विभागाने समन्वय साधून परिसरात गस्त वाढवावी, नागरिकांना सतर्कतेबाबत मार्गदर्शन करावे, तसेच वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

या प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मृतक कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.

या दुर्दैवी घटनेमुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून, शासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.