spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठीत नायलॉन मांजा ने रामनगर उड्डाणपुलावर एकाच वेळी तिघे जखमी

– एकाचा गळा चिरला, महिलेच्या डोळ्यावर जखम तर एका मुलाच्या हाताची करंगळी कापली

कामठी :- शहरात नायलॉन मांजाचा हैदोस अद्याप थांबलेला नाही. आज शुक्रवार ला संध्याकाळी रामनगर उड्डाण पुलावर एका अत्यंत भीषण घटनेत पतंगीच्या धारदार नायलॉन मांजा मुळे एका युवकाचा गळा खोलवर चिरला गेला. या युवकासोबतच अन्य दोन जणही गंभीर जखमी झाले असून, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यमदूत ठरतोय नायलॉन मांजा

मिळालेल्या माहितीनुसार, मुन्नवर खान (४०) हे आपल्या दुचाकीने रामनगर उड्डाण पुलावरून जात असताना अचानक लोंबकळणारा नायलॉन मांजा त्यांच्या गळ्याला अडकला. काही समजण्याच्या आतच या धारदार मांजाने त्यांचा गळा चिरला. या जखमेमुळे त्यांच्या श्वासनलिकेला गंभीर इजा झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. याच उड्डाणपुलावर अशाच प्रकारे अन्य दोन व्यक्तीही मांजाच्या विळख्यात सापडून गंभीर जखमी झाल्या आहेत. हे तिघेही आपापल्या वाहनाने या उड्डाण पुलावरून जात होते.

उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार, नागपूरला रवानगी

तिन्ही जखमींना तातडीने कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. जखमी मुन्नवर खान यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर अंजुम मोहसीन खान या महिलेच्या उजव्या डोळ्याच्या वर गंभीर जखम झाली असून तिरपुडे नावाच्या एका मुलाच्या उजव्या हाताची करंगळी कापल्या गेली आहे.

त्या दोघांवरही उपचार सुरू असल्याचे समजते.

प्रशासनाचे दुर्लक्ष की नागरिकांचा बेजबाबदारपणा?

मकर संक्रांतीचा सण संपून अनेक दिवस झाले तरी, शहरात नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे. पोलीस प्रशासन आणि नगर परिषद केवळ कागदोपत्री कारवाई करत असल्यामुळेच आज एका निष्पाप युवकाचा जीव धोक्यात आला आहे, अशा भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. रामनगर उड्डाण पुलावर अशा घटना वारंवार घडत असूनही तिथे जाळ्या बसवणे किंवा सुरक्षात्मक उपाय का केले जात नाहीत, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

या घटनेनंतर पोलीस आता नायलॉन मांजा विकणाऱ्या दुकानांवर पुन्हा धाडी टाकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.