नागपूर :- रब्बी हंगाम २०२४च्या पीक स्पर्धा योजनेंतर्गत नागपूर विभागातील एकूण ११५ विजेत्या शेतकऱ्यांना ७ लाखांच्या बक्षीसे लवकरच वितरीत होणार आहेत. विभागातून तीन शेतकऱ्यांना राज्यस्तरीय, ३८ शेतकऱ्यांना जिल्हा तर ७४ शेतकऱ्यांना तालुका स्तरीय पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या योजनेंतर्गत राज्यातील १ हजार ७ शेतकऱ्यांना बक्षिस वितरीत करण्यात येणार आहे.
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे व त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात भर पाडण्याच्या उद्देशाने शासन राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धांचे आयोजन करते. राज्यातंर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पीकस्पर्धा घेण्यात येते.
सन २०२५-२६ साठी विविध कृषि पुरस्कार व पीकस्पर्धा योजनेअंतर्गत ८ कोटींची अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली आहे. तर रब्बी हंगाम २०२४ मधील, एकूण १००७ पीकस्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांना बक्षीस रक्कम अदा करण्याकरिता कृषी,पशु संवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या १३ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार कृषी आयुक्तालयास ५७ लाख २० हजारांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नागपूर विभागातील ११५ शेतकऱ्यांना ७ लाखांची बक्षिसे
रब्बी हंगाम २०२४च्या पीक स्पर्धेत भाग घेणाऱ्या नागपूर विभागातील शेतकऱ्यांपैकी ११५ शेतकऱ्यांची निवड तीन स्तरांवरील पुरस्कारांसाठी करण्यात आली. यानुसार तीन शेतकऱ्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली असून बक्षिसापोटी १ लाख २० हजारांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.
जिल्हा स्तरीय पुरस्कारासाठी ३८ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून बक्षिसापोटी २ लाख ८९ हजारांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे. तर ७४ शेतकऱ्यांची तालुकास्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली असून बक्षिसापोटी २ लाख ९१ हजारांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.
रब्बी हंगाम २०२४च्या पीक स्पर्धेंतर्गत राज्यातील एकूण १ हजार ७ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना ५७ लाख २० हजारांची बक्षिस वितरीत करण्यात येणार आहे. २६ शेतकऱ्यांची राज्यस्तरीय,२८० शेतकऱ्यांची जिल्हा तर ७०१ शेतकऱ्यांची तालुका स्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.








