spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

इंदोरा चौक, गड्डीगोदाम आणि झिरो माईल येथे फर्स्ट आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी शेअर ऑटो रिक्षा 

महा मेट्रोने तीन नव्या स्थानकांवर शेअर ऑटो रिक्षा सेवा केली सुरु
नागपूर, २१ : नागपूर मेट्रो प्रवाशांसाठी फर्स्ट आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून महा मेट्रोने आज ‘शेअर ऑटोरिक्षा सेवा’चा विस्तार इंदोरा चौक, गड्डीगोदाम चौक आणि झिरो माईल फ्रीडम पार्क या महत्त्वाच्या स्टेशन पासून सुरु केली आहे. या नव्या सेवेसह, सध्या नागपूर मेट्रोच्या २४ स्थानकांवर शेअर ऑटो रिक्षा सेवा उपलब्ध आहेत. “महा मेट्रोचा उद्देश उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी सेवा प्रदान करणे असून,शेअर रिक्षा सेवा इंटिग्रेट करून, घर ते गंतव्यापर्यंतचा प्रवास अधिक सुलभ, परवडणारा आणि पर्यावरणपूरक बनवण्याचा प्रयत्न आहे.
पूर्वी सुरू करण्यात आलेल्या स्थानकांवरील अनुभवावरून, महा मेट्रोच्या आकडेवारीनुसार प्रवाशांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. शेअर रिक्षा उपलब्ध असलेल्या स्थानकांवर सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्याच काही महिन्यांत दररोजच्या प्रवाशांमध्ये ८–१०% इतकी वाढ नोंदविण्यात आली, यामुळे स्पष्ट होते की चांगल्या फीडर सेवा अधिक प्रवाशांना मेट्रोकडे आकर्षित करत आहेत.प्रवाशांच्या अभिप्रायावरून महा मेट्रोने पिकअप पॉइंट्समध्ये बदल केले, मार्गांचे पुनर्रचना केली आणि वेळापत्रकांमध्ये सुधारणा केली. परिणामी, प्रतिक्षा वेळ कमी झाली असून सेवा आजूबाजूच्या निवासी आणि व्यापारी भागांपर्यंत विस्तारित झाली आहे.
नागपूरमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा वापर गेल्या वर्षभरात सातत्याने वाढला आहे. मागील आठवड्यात मेट्रोचा सरासरी दररोजचा प्रवासीसंख्या ९९,४४८ इतकी होती, तर आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी हा आकडा १,०४,३४६ पर्यंत गेला. शेअर रिक्षा, ई-रिक्षा आणि ई-ऑटो अशा शेअर मोबिलिटी सेवा या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून, निश्चित मार्गांच्या दरम्यान प्रवाशांचे अंतिम गंतव्य सहज गाठण्यास मदत करतात.
स्थानिक प्रवाशांनी या नव्या सेवेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. “मी पूर्वी गड्डीगोदाम मेट्रो स्थानकावर उतरल्यावर सुमारे ६५० मीटर चालत कॉलेजला जात असे. आता स्टेशनच्या बाहेरच शेअर रिक्षा मिळणार असल्यामुळे वेळ वाचणार आहे,” असे एका विद्यार्थ्याने सांगितले.
आजच्या विस्तारानंतर, उर्वरित मेट्रो स्थानकांवरही यावर्षी शेअर मोबिलिटी सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस आहे. यामुळे नागपूरची ओळख एकात्मिक आणि हरित नागरी वाहतुकीच्या आदर्श मॉडेल म्हणून अधिक बळकट होणार आहे.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.