Saturday, February 21, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“हिंमत असेल तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा!” – आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे पोलिसांना थेट आव्हान; खोकरल्यात शिवरायांचे पूजन

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची स्थापना केल्याच्या आरोपावरून खोकरला येथील पाच तरुणांवर गुन्हे दाखल केल्याची घटना ताजी असतानाच, आता या वादात स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उडी घेतली आहे. गुरुवारी खोकरला येथे पोहोचून भोंडेकर यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन केले आणि “हिंमत असेल तर माझ्यावरही गुन्हा दाखल करून दाखवा,” असे थेट आव्हान पोलीस प्रशासनाला दिले.

शिवजयंतीच्या निमित्ताने आमदार नरेंद्र भोंडेकर आपल्या समर्थकांसह खोकरला गावात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अत्यंत तीखे प्रहार केले. “महाराष्ट्र शासनाचा पगार घेऊन ‘मोगलाई’ विचारसरणीला खतपाणी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. केवळ वरिष्ठांची शाबासकी मिळवण्यासाठी पोलीस अधिकारी शिवप्रेमी तरुणांवर अन्यायकारक कारवाई करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

खोकरला येथील ज्या जागेवरून स्मारकाचा वाद सुरू आहे आणि जिथे तणावाचे वातावरण आहे, नेमक्या त्याच ठिकाणी जाऊन आमदार भोंडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि विधीवत पूजन केले. “शिवरायांचे पूजन करणे जर गुन्हा असेल, तर हा गुन्हा मी केला आहे. माझ्यावर गुन्हा दाखल करा,” असे आव्हान त्यांनी पोलिसांना दिले.

याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उल्लेखनीय आहे की, काही दिवसांपूर्वीच खोकरला येथे अधिकृत परवानगीशिवाय शिवस्मारक स्थापन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी पाच स्थानिक तरुणांवर गुन्हे दाखल केले होते. या कारवाईचा विश्व हिंदू परिषदेनेही तीव्र निषेध केला असून, गुन्हे मागे न घेतल्यास उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता आमदारांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप केल्यामुळे पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com