Saturday, February 21, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गणेशपूर प्रवेशद्वारावर शिवजयंतीचा जल्लोष; जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या हस्ते शिवरायांचे पूजन

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :-  स्वराज्य संस्थापक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गणेशपूर येथे अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक थाटामाटात साजरी करण्यात आली. गणेशपूर प्रवेशद्वार येथे महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन आणि अभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संदीप बोरकर आणि त्यांच्या अर्धांगिनी सुधा बोरकर, तसेच जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता हितेश खोब्रागडे यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक आणि विधिवत पूजन करण्यात आले.

नेटक्या नियोजनाने वाढली सोहळ्याची शोभा

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्या नेतृत्वात या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समिती सदस्य कीर्ती गणवीर, सरपंच विद्या मेहर, उपसरपंच चितेश मेहर आणि गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक कृष्णाजी थोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांनी पूजन विधी दरम्यान पाहुण्यांना विशेष सहकार्य केले.

शिवजयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला गणेशपूर गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, युवक मंडळी आणि विविध संघटनांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये प्रामुख्याने गुरुदेव सेवा मंडळ, ग्रामपंचायत गणेशपूरचे सर्व पदाधिकारी, गणेशपूर डिजिटल पब्लिक स्कूलचे सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद, तसेच अंगणवाडीतील चिमुकले बालगोपाल व त्यांच्या शिक्षिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. महिला मंडळाची उपस्थिती देखील लक्षणीय होती.

“प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत, सिहांसनाधीश्वर, योगीराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!” अशा घोषणांनी संपूर्ण गणेशपूर परिसर दुमदुमून गेला होता. “आमचे तुमचे नाते काय – जय जिजाऊ जय शिवराय” या घोषणांनी उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले.

“सागराचे पाणी कधी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही, हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी नाद शिवरायांचा सुटणार नाही,” अशा शब्दांत शिवभक्तांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शेवटी शिवरायांच्या प्रतिमेची आरती करून आणि शिवप्रेमींना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com