– मर्दानी खेळ, नाटिके सह जल्लोषात शिवजागर
हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. या पदयात्रेची सुरूवात गांधी चौकातुन झाली.याप्रसंगी राज्य गीताने कार्यक्रमाला सुरूवात झाली.
जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन मुख्य, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण,उपजिल्हाधीकारी प्रशांत पडघन,जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे,शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के, मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास,अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे , मेरा युवा भारतचे युवा अधिकारी सुशील भड उपस्थित होते.
आज सकाळी नगरपालीकेचे सर्व नगरसेवक-नगरसेवीका,पदाधिकारी या पदयात्रेत सहभागी झाले होते.गांधी चौकातून ढोल ताशा वादयासंह व पारंपारिक वेशभुषेतील युवक युवती सहभागी झाले होते.यामध्ये शिवाजी राजाच्या, माता जिजाऊच्या वेशभुषेतील युवक –युवती मिरवणुकीत सहभागी झाले होते. शालेय विदयार्थी विदयार्थीनी लेझीम पथकावर ताल धरला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिवचरित्रातील प्रसंगावर नाटिका ,नृत्य ,सादर केले.![]()
पदयात्रेमध्ये लाल बहाददूर शास्त्री बँड पथक, नुतन कन्या शाळा, बँड पथक ,नुतन महाराष्ट्र विद्यालय भंडारा, अष्टेडू मैदानी आखाडा पथक, पवनी, सनि स्प्रिंगडेल स्कुल, भंडारा छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती, शुक्रवारी , राष्ट्रीय जिवनोन्नती अभियान , अग्निशमन विभाग सहभागी झाले होते.
पदयात्रेला जल्लोषात सुरुवात झाली पदयात्रेमध्ये राष्ट्रीय जीवन्नोती अभियान नगरपरिषद अंतर्गत विविध महिला बचत गटांनी ऐतिहासिक पात्राच्या भूमिकेमध्ये वेशभूषा केली होती. त्यानंतर जिल्ह्यातील मर्दानी खेळांचे सादरीकरण अष्टेंडू आखाडाच्या खेळाडूंनी केले. लेझीम पथक उत्साह वाढवत होते. मर्दानी खेळांच्या सादरीकरणाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला.पदयात्रेत जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख ,अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी ,विद्यार्थी सामाजिक संस्था यांच्यासह मोठया संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. तसेच जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तसेच विविध शासकीय व खासगी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सकाळी ८ वाजता नगरपालिका, गांधी चौक येथे या पदयात्रेस प्रारंभ झाला. गांधी चौकातून शास्त्री चौक मार्गे शिवाजी वॉर्ड येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या यात्रेचा समारोप झाला. पदयात्रेदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरण केले.समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी प्रशासनाच्या वतीने पोलीस अधिक्षक नुरूल हसन,निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले .पुतळा समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शेकडो विद्यार्थी, खेळाडू, एनसीसी, एनएसएस, विविध क्रीडा संघटनांचे सदस्य, सामाजिक संस्था आणि नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले. जयघोषांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले.