spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडाऱ्यातील ड्रग्स तस्कर ‘बबलू’ला एमपीडीएचा दणका; अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी

– पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांची मोठी कारवाई

भंडारा :- भंडारा शहरातील अंबिका नगर, भोजापूर परिसरातील कुख्यात ड्रग्स तस्कर आणि सराईत गुन्हेगार साद जाहीद ऊर्फ बबलू जामा कुरेशी (२३) याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना लगाम घालत, भंडारा पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीए (MPDA) कायद्यान्वये कठोर कारवाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याची रवानगी अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

साद कुरेशी हा गेल्या सहा वर्षांपासून भंडारा शहरात सक्रिय असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करणे, न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा आणून साक्षीदारांना भररस्त्यात चाकूचा धाक दाखवून धमकावणे, दुकानदारांना लुटणे आणि जबरीने पैसे हिसकावणे यांसारख्या कृत्यांनी त्याने परिसरात दहशत निर्माण केली होती.

केवळ गुंडगिरीच नव्हे, तर साद कुरेशी हा अमली पदार्थांच्या तस्करीतही मोठ्या प्रमाणावर गुंतलेला होता. नागपूरवरून ड्रग्स आणि गांजा आणून तो भंडारा व परिसरात विकायचा. त्याच्या या समाजविघातक कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आली होती. या ‘ड्रग्स तस्कर’ आणि ‘धोकादायक गुंडा’वर अकुंश लावण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीए लावण्याचा प्रस्ताव तयार केला होता.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले स्थानबद्धतेचे आदेश

पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा पोलिसांनी तयार केलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दि. ५ मार्च २०२६ रोजी स्वाक्षरी केली. या आदेशान्वये साद कुरेशीला स्थानबद्ध करून त्याची रवानगी अमरावती मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भोजापूर आणि शहरातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (पवनी) विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिचोळकर, भंडारा शहरचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी व त्यांच्या पथकाने केली आहे. “शहराची शांतता भंग करणाऱ्या आणि ड्रग्स तस्करी करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही. यापुढेही अशा धोकादायक व्यक्तींवर एमपीडीए अंतर्गत कारवाई सुरूच राहील,” असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Popular Articles