– वाघाये महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘एकदिवसीय सेमिनार’ उत्साहात संपन्न
हंसराज,प्रतिनिधी भंडारा लाखनी :- स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लाखनी येथे २८ फेब्रुवारी रोजी डॉ. सी. व्ही. रमण यांच्या अतुलनीय कार्याप्रित्यर्थ ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात ‘एकदिवसीय सेमिनार’चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश एम. कापसे होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. श्रीकांत एम. भुसारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुधाकर एस. शेंडे यांनी केले. त्यांनी डॉ. सी. व्ही. रमण यांच्या ‘रमण इफेक्ट’ आणि ‘स्केटरिंग ऑफ लाईट’ या जागतिक स्तरावरील संशोधन विषयावर सविस्तर प्रकाश टाकला.
प्रमुख वक्ते डॉ. श्रीकांत भुसारी यांनी आपल्या मार्गदर्शनात दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या आधुनिक युगात नवनवीन शोध लागत असून भारत देश वैज्ञानिक क्षेत्रात जागतिक स्तरावर कसा अग्रेसर आहे, याची माहिती त्यांनी दिली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांनी विज्ञानाच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, “मानवाने वैज्ञानिक प्रगती केली आहे, परंतु तो विज्ञानाचा वापर निसर्गाच्या विनाशासाठी करत आहे ही मोठी शोकांतिका आहे. मानवाने निसर्गाचे संरक्षण करण्याकडे आपले लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.”
या सेमिनारमध्ये ‘इंडियन वुमन्स कॉन्ट्रीब्युशन टू सायन्स’ (भारतीय महिलांचे विज्ञानातील योगदान) या विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. प्राणीशास्त्र विभागाच्या डॉ. गीता टिचकुले यांनी अनेक महिला शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा आढावा घेतला. तसेच वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. मंगेश वंजारी यांनी विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिला संशोधकांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी प्रा. श्रद्धा बोरकर, डॉ. अनुराधा खाडे, डॉ. चंद्रशेखर देवघरे, डॉ. मनमोहन भैसारे, प्रा. तुषार डोंगरवार, डॉ. हर्षा वलथरे, डॉ. सागर वारंगणे, डॉ. बबन ढोंगे, डॉ. धर्मेंद्र सिंग, प्रा. सपाटे, प्रा. स्मिता तितरमारे, प्रा. कवी सूर्यवंशी, प्रा. मंगेश कुकडे, प्रा. मुन्ना हलमारे, प्रा. ज्ञानेश्वरी रांगडाले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके संचालन डॉ. प्रमोद भोयर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. रूपचंद डोंगरवार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.