“हवामान अनुकूल तंत्रज्ञान” कृषी ताईंचे प्रशिक्षण

0
45

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- हिवरा बाजार येथील शेतकरी प्रशिक्षण केंद्रात “हवामान अनुकूल तंत्रज्ञान” या विषयावर कृषी ताईंकरिता लोकसहभाग श्रमदान चळवळ उपक्रम अंतर्गत विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात कृषी ताईंना विविध कृषी तंत्रज्ञानांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. त्यामध्ये बियाणे उगवण चाचणी, बियाण्याची बीजप्रक्रिया, दशपर्णी अर्क तयार करणे, लिंबोळी अर्क तयार करणे, पक्षी थांबे लावणे, चिकट सापळे लावणे, कामगंध सापळ्यांचा वापर तसेच शून्य मशागत पद्धती यांसारख्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात व पर्यावरणपूरक पद्धतीने शेती करण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान कृषी ताईंची त्रैमासिक उजळणी देखील घेण्यात आली. या माध्यमातून त्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील कामकाजासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान उपस्थित मान्यवर व समूह सहाय्यकांनी कृषी ताईंना हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धती अवलंबण्याचे महत्त्व सांगितले. या प्रशिक्षणातून कृषी ताईंना शेतीतील नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास मोठी मदत होणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले. या कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी ग्रीष्मा डेहने तालुका कृषी अधिकारी सुनिल कोरटे, शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे उपकृषी अधिकारी दिनेश उईके, टेक्निकल कॉर्डिनेटर जयश्री गभणे, मंडळ कृषी अधिकारी रवी राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, सहाय्यक व समुह सहाय्यक धनश्री निघोट, कल्याणी कापकर, तनुश्री खोब्रागडे, सुवर्णा सुरवसे, लोकेश अलोने, रोहीत गौतम, निखील बावनकर आदी उपस्थीत होते. संचालन धनश्री निघोट तर आभार प्रदर्शन सुवर्णा सुरवसे यांनी केले.