कामठी तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी

0
42

कामठी :- महिनाभर रोजे करून सश्रद्ध भावनेने अल्लाहची ‘ईबादत’केल्यानंतर आज शनिवारी कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात मुस्लिम समाजबांधावांनी ‘ईद -उल-फ़ित्र'(रमजान ईद)उत्साही, आनंदी आणि मंगलमय वतावरणात साजरी केली.

हिंदू मुस्लिम बांधवानी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.दिवसभर घरोघरी शिरखुर्म्याचा आस्वाद घेत सर्वांनी रमजान ईद चा आनंद लुटला.सकाळी शहरातील सर्व मशिदी तसेच छावणी परिषद स्थित रब्बानी मैदान ईदगाह गिरीजाघर मैदानात क्रमशा सकाळी साडे आठ व साडे नऊ वाजता सामूहिक नमाज अदा करण्यात आली.त्यानंतर उपस्थित मुस्लिम समाजबांधवांचे खासदार श्यामकुमार बर्वे,माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा  कुंभारे,माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर,मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती हुकूमचंद आमधरे, नगराध्यक्ष अजय अग्रवाल, कामठी नगर परिषद चे विरोधी गट नेता नगरसेवक काशिनाथ प्रधान,माजी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत, माजी नगराध्यक्ष माया चवरे,माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मांनवटकर,माजी उपाध्यक्ष अजय कदम,माजी नगरसेवक कपिल गायधने, अश्फाक कुरेशी, आदीनी रमजान ईद च्या शुभेच्छा देत स्वागत केले.

गेले महिनाभर रमजान चे रोजे करून मुस्लिम कुटुंबियानी अल्लाह व त्याचे प्रेषित मोहम्मद पैगंम्बर विषयी श्रद्धा प्रकट केली.महिनाभर प्रार्थना व नमाजपठणात मग्न झाल्यानंतर संपूर्ण महिन्याचे रोजे कसे संपले हे कळले सुदधा नाही.शेवटी रमजान ईदचे वेध लागले तेव्हा या पवित्र महिन्याला निरोप देताना सर्वांच्या भावना उचंबळून आल्या होत्या.काल शुक्रवारी चंद्रदर्शन होताच ‘ईद का चांद मुबारक’म्हणून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.ईदच्या दिवशी आज शनिवारी सकाळी सर्व मशिदी इदगाह मैदानावर मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून व अत्तर लावून प्रसन्न चित्ताने नमाजसाठी एकत्र आले .तसेच रब्बानी इदगाह व गिरीजाघर मैदान येथे सामूहिक नमाज पठण करीत देशात व जगभर सुख शांती नांदू दे, बेरोजगाराना रोजगार मिळू दे.आजारी व संकटात सापडलेल्याची ईडा पीडा टळू दे. खऱ्या अर्थाने सर्वांना धर्माने सांगितलेल्या मार्गावरुन चालण्याची सद्बुद्धी मिळू दे अशी प्रार्थना करण्यात आली.

इदनिमित्त घरोघरी तयार करण्यात आलेल्या शिरखुर्म्याच्या मधुर आस्वादाने ईदचा गोडवा वाढविला. या आनंदामध्ये मुस्लिम समाजबांधवा बरोबर हिंदू समाजबांधव परिवारही सहभागी झाला होता. दिवसभर मुस्लिम समाजबांधवांच्या घरी ईद मिलनाची रेलचेल सुरू होती.हिंदू मुस्लिम बांधव एकमेकांना भेटून आलिंगण देऊन ईदच्या शुभेच्छा देत होते.

ईद च्या पाश्वरभूमीवर गोल बाजार, फेरूमल चौक, परिसरात ईदसाठी लागणाऱ्या विविध वस्तू,साहित्य तसेच कपडे ,टोप्या,अत्तर,सुरमा,चप्पल,बूट,सौंदर्य प्रसाधने,सुका मेवा, शेवया,खजूर,आदींची बाजारपेठ भरली होती तर या वस्तूंची खरेदी करण्यासाठी अबालवृद्धांची झुंबड उडाली होती.ईदच्या पूर्वरात्रेला अक्षरशा जत्रेचे स्वरूप आले होते .रात्रभर सलून,चप्पल बूट ,शेवया,मेवा,कपडे आदी दुकाने सुरू होते. यात मोठ्या प्रमानात आर्थिक उलाढाल करण्यात आली. वाढती महागाई व दररोजच्या जीवनाची रनांगणाची लढाई क्षणभर बाजूला ठेवुन ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांना मोठी आर्थिक कसरत करावी लागली.तसेच रमजान ईद पर्व हा मोठ्या उत्साहाने यशस्वीरीत्या पार पडावा यासाठी पोलीस विभागातर्फे पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनार्थ एसीपी अंकुश खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.