– ‘जागतिक जल दिनी’ स्वयंसेवी संस्थांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
– नाग, पिवळी, पोहरा नदी अन् तलावांच्या स्वच्छतेसह ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’वर विशेष भर
नागपूर :- ‘जागतिक जल दिना’चे औचित्य साधून नागपूर शहराचे नैसर्गिक वैभव असलेल्या जलस्त्रोतांचे संवर्धन, संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी महापौर निता ठाकरे यांनी आज विविध स्वयंसेवी संस्थांसोबत एक विशेष बैठक घेतली. या बैठकीला सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत महापौर निता ठाकरे यांनी नागपूरमधील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या मुख्य जलवाहिन्यांसह शहरातील अंबाझरी आणि फुटाळा तलावाच्या सद्यस्थितीवर या बैठकीत सविस्तर चर्चा केली.विशेषतः तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलेली जलपर्णी ही एक गंभीर समस्या बनली असून, त्यातून कायमस्वरूपी सुटका कशी मिळवता येईल, यावर प्रामुख्याने विचारमंथन करण्यात आले.

बैठकीत उपस्थित असलेल्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी जलसंवर्धनासाठी आपापले अनुभव, मते आणि तांत्रिक उपाययोजना मांडल्या. महापौरांनी या सर्व संस्थांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले. नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि जलपर्णीची समस्या सोडवण्यासाठी नेमकी कोणती ‘अॅक्शन’ घेणे आवश्यक आहे, याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. या सूचनांची अंमलबजावणी करून लवकरच ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले.
रेन वॉटर हार्वेस्टिंग’
भूजल पातळी वाढवण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा मंत्र केवळ नद्या आणि तलावांची स्वच्छताच नव्हे, तर भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता शहराची भूजल पातळी वाढवणे अत्यंत आवश्यक असल्याचे महापौरांनी नमूद केले. यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ वर भर देण्याबाबत बैठकीत चर्चा केली.



