नागपूर :- अयोध्येचे महाराज दशरथ व माता कौशल्या यांच्या पोटी अवतरलेले प्रभू श्रीराम हे धर्म, सत्य, कर्तव्य आणि आदर्श जीवनाचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या जन्मदिनाचा पवित्र उत्सव म्हणजेच रामनवमी, जो संपूर्ण भारतात तसेच जगभरातील हिंदू बांधवांकडून मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात साजरा केला जातो.
रामनवमी हा केवळ एक सण नसून, तो भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. प्रभू श्रीरामांचे जीवन म्हणजे आदर्श पुत्र, आदर्श राजा, आदर्श भाऊ आणि आदर्श पती यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्या जीवनातून सत्य, संयम, कर्तव्यनिष्ठा आणि धर्मपालन यांचे महान संदेश मानवजातीला मिळतात.
महर्षी वाल्मिकी यांनी रचलेले रामायण हे महाकाव्य केवळ एक कथा नसून, ते जीवन जगण्याची दिशा दाखवणारे आध्यात्मिक मार्गदर्शन आहे. रामायणातील प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक पात्र मानवाला योग्य-अयोग्य यातील फरक समजावून सांगते. रामराज्याची संकल्पना ही न्याय, समता आणि सर्वांच्या कल्याणावर आधारित होती, जी आजही आदर्श मानली जाते.
शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर उभारले गेले आणि रामलल्ला आपल्या स्वगृहात विराजमान झाले, हा क्षण संपूर्ण देशासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा ठरला. त्या दिवशी देशभरात दीपोत्सव आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तेव्हापासून लाखो रामभक्त अयोध्येत दर्शनासाठी जात आहेत, ही श्रद्धा आणि भक्ती दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे.
रामनवमीच्या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये आणि हनुमान मंदिरांमध्ये रामकथा, भजन, कीर्तन आणि अन्नदानाचे आयोजन केले जाते. भक्तगण प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करून आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभावी अशी कामना करतात.
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात, “दवा आणि दुवा” दोन्हींची आवश्यकता आहे. प्रभू श्रीराम आणि त्यांच्या परमभक्त हनुमान यांचे स्मरण केल्याने मानसिक शांती, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. समाजातील संकटे, दुःख आणि अडचणी दूर होण्यासाठी रामनामाचा जप आणि श्रद्धा हेच खरे बलस्थान आहे.
रामायणातील गुरु-शिष्य परंपरा, संस्कार आणि आध्यात्मिक मूल्ये आजही तितकीच महत्त्वाची आहेत. प्रत्येक व्यक्तीने रामांच्या आदर्शांचा अंगीकार करून आपले जीवन अधिक सुंदर, यशस्वी आणि अर्थपूर्ण बनवावे, हा या पवित्र सणाचा खरा संदेश आहे.
या पवित्र रामनवमीच्या निमित्ताने सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदो, अशी प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना.



