गुन्हे शाखेचा रनाळा परिसरात जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांना अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
27

कामठी :- शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ ने नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रनाळा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १७ आरोपींना अटक करण्यात आली असून, जुगाराचे साहित्य आणि रोख रकमेसह एकूण ३,०२,५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट ५ चे पथक रनाळा रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून रनाळा ग्रामपंचायत हद्दीत जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी गणेश कदम आणि त्यांच्या पथकाने २२ मार्च २०२६ रोजी दुपारी ३:३० ते ५:०० च्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला.

पोलिसांनी घटनास्थळावरून मोहम्मद इब्राहिम (४०), सय्यद इम्रान (४०), क्रांती दीपक साहू (३२), सुशील शेंडे (२५) यांच्यासह एकूण १७ आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणात जुगारासाठी जागा उपलब्ध करून देणारा मुख्य आरोपी प्रफुल्ल अंबादास राव (रा. रनाळा) सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

छाप्यादरम्यान पोलिसांनी ५२ ताश पत्ते, ११,२८० रुपये रोख आणि आरोपींकडून १६ महागडे मोबाईल फोन (किंमत २,९१,०७० रुपये) असा एकूण ३,०२,५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.