अवैध रेती वाहतूक करणारा २५ लाखांचा टिप्पर जप्त: मोहाडी पोलिसांची कारवाई

0
49

हंसराज,प्रतिनिधी भंडारा मोहाडी :- तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात मोहाडी पोलिसांनी कंबर कसली असून, खैरी परिसरात केलेल्या कारवाईत २५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ट्रक चालक आणि मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहाडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी मौजा खैरी परिसरात गस्त (पेट्रोलिंग) घालत असताना, त्यांना एका संशयास्पद टिप्परची माहिती मिळाली. टाटा कंपनीचा ट्रक (क्र. MH 36 AL 6007) हा विनापरवाना अवैध रेतीची चोरटी वाहतूक करताना पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी तात्काळ वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यात सुमारे ६ ब्रास रेती आढळून आली.

या प्रकरणी पोलिसांनी सुनील रामराख गलबले (वय २९, रा. रोहा मोहाडी) आणि,ट्रक मालक प्रदीप उर्फ बबलू राधेश्याम बांडेबुचे (वय ३०, रा. रोहा, ता. मोहाडी) यांच्यावर कारवाई केली आहे. ट्रक मालकाच्या सांगण्यावरूनच चालक विनापरवाना रेतीची वाहतूक करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

या कारवाईत २५ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक आणि ३६ हजार रुपये किमतीची ६ ब्रास रेती, असा एकूण २५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात अप. क्र. १६२/२०२४ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) व ४९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदरची यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई मोहतुरे, पोलीस हवालदार पाठक व मोहाडी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास मोहाडी पोलीस करत आहेत.