सीईटी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गोंधळ, कंत्राटदार कंपनीच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप!

0
40

नागपूर :- बॅचलर ऑफ एज्युकेशन – बीएड (जनरल व स्पेशल ) व बीएड (इएलसीटी) या अभ्यासक्रमाची सीईटीला २७ मार्चपासून सुरुवात होत आहे. तीन दिवस चालणारी ही परीक्षा विविध सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. बीएडसाठी राज्यभरातून १ लाख १० हजार ४२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) प्रवेश परीक्षा राबवण्यात येत आहेत. बीएड अभ्यासक्रमाची २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश परीक्षा २७ ते २९ मार्चदरम्यान घेण्यात येणार आहे. यावर्षी बीएड या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी १ लाख १० हजार ४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी माेठा गोंधळ उडाला आहे. नागपूरच्या वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर ३ वाजताची परीक्षा ४ वाजले तरी सुरू झालेली नव्हती. यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.

परीक्षा संगणकाधारित पद्धतीने

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी उच्च शिक्षण अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर झाल्या आहेत. विधि (३ वर्ष व ५ वर्ष), बीएड (जनरल व स्पेशल) व बीएड (इएलसीटी), बीपीएड, एमएड, एमपीएड व बीएड एमएड या सात अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या तारखा सीईटी कक्षाने निश्चित करत अंतिम तारखा जाहीर केल्या. या सात अभ्यासक्रमापैकी सहा प्रवेश परीक्षेची प्रवेश नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील विधि (५ वर्ष) या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची नोंदणी १५ मार्चपर्यंत सुरू केली होती. यावर्षीच्या नोंदणीमध्ये ८ तृतीयपंथी, ४३८ अनाथ विद्यार्थी व ६८९ दिव्यांग विद्यार्थी बीएडची प्रवेश परीक्षा देणार आहेत. मागील वर्षी बीएड सीईटीच्या प्रवेश परीक्षेमध्ये १ लाख १६ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या अभ्यासक्रमांसाठीची ही सीईटी परीक्षा संगणकाधारित पद्धतीने होणार आहे. ही परीक्षा राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

नेमका गोंधळ काय?

बीएड या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर गेले. दुपारी ३ ते ४.३० या वेळेत परीक्षा होणार होती. त्यासाठी दुपारी २ वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, दुपारचे ३.३० झाले तरी परीक्षा सुरू झाली नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. यावेळी मोठी गर्दी परीक्षा केंद्रावर झाली होती. या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठीही कुठलीही सुविधा नव्हती, अशीही परीक्षार्थींची तक्रार आहे.

चार वर्षांत बीएड प्रवेश परीक्षेस नोंदणी केलेले विद्यार्थी

२०२३-२४ – ७९,९८४

२०२४-२५ – ७९,०८३

२०२५-२६ – १,१६,५८५

२०२६-२७ – १,१०,०४२