spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शहर बस वाहतूक बळकट करण्यावर भर

– मनपाच्या परिवहन विभागाचा अर्थसंकल्प परिवहन सभापतींना सादर

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन व्यवस्थापक डॉ. मेघना वासनकर यांनी मनपाच्या परिवहन विभागाचा 2025-26 चा सुधारित अर्थसंकल्प व 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा 524 कोटी 58 लाख रुपयांचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन सभापती  मंगला खेकरे यांना सादर केला.

परिवहन विशेष समितीची बैठक आज (ता. 30) डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी सभापती मंगला खेकरे होत्या. यावेळी परिवहन समितीचे सदस्य सुधीर राऊत, पूजा पाठक, शैलेश रामसुंदर पांडे, दिनेश यादव, शकील पटेल, अर्चना पडोळे, विजय होले, मंगला मस्के, रुपाली ठाकूर उपस्थित होते.

परिवहन व्यवस्थापक डॉ. मेघना वासनकर यांनी मनपाच्या परिवहन विभागाचा अर्थसंकल्प सादर करताना नागपूर शहरात शहर बस वाहतूक बळकट करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. परिवहन विभागाचा 2026-27 या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न 524 कोटी 7 लाख राहण्याची अपेक्षा आहे. या सुरूवातीची शिल्लक 50 लाख 28 हजार रुपयांची आहे. अशी एकूण मिळकत 524 कोटी 58 लाख रुपये राहणार आहे. या आर्थिक वर्षात परिवहन विभागामार्फत 524 कोटी 9 लाख रुपयांचा खर्चाची अपेक्षा आहे.

बस वाहतुकीची व्याप्ती वाढविणार – मंगला खेकरे

परिवहन समितीच्या सभापती मंगला खेकरे यांनी अर्थसंकल्प स्वीकारल्यानंतर या अंदाजपत्रकावर चर्चा करून स्थायी समितीला त्वरित सादर केला जाईल, असे सांगितले. शहरातील वाहतूक व्यवस्थेची व्याप्ती अधिक वाढविण्यासाठी उपाययोजना केल्या जाईल. तसेच ज्या ठिकाणी अद्यापही शहर बस पोहोचत नाही, अशा ठिकाणी शहर बस वाहतूक देण्याचा प्रयत्न या वर्षात राहणार असल्याचे मंगला खेकरे यांनी सांगितले.

शहर बस ताफ्यात 385 ई-बसेस, डिझेलवर धावणाऱ्या 150 मिडी बसेस व 45 मिनी बसेस अशा एकूण 580 बसचा ताफा आहे. दररोज सरासरी 1 लाख 61 हजार प्रवाशांची संख्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Popular Articles