सफाई कर्मचारी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
62

 
सफाई कामगारांच्या पाल्यांनी उद्योगाकडे वळावे –  शेरसिंग डागोर

नागपूर, दि. २३ : वंचित घटकांतील लोकांना सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग शर्तीने प्रयत्न करत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन सफाई कामगारांच्या मुलांनी आपले शिक्षण गुणवत्तेने पूर्ण केले पाहिजे. याचबरोबर स्वयंरोजगाराच्या दृष्टीने कौशल्य आत्मसात करुन विविध उद्योगधंदयाकडे वळण्याचे आवाहन राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभाग, महानगरपालिका व राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या संयुक्त विद्यमाने इमामवाडा येथे  स्वच्छतादूत कल्याणकारी दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त आयोजित कार्यक्रमास विधान परिषद सदस्य संदीप जोशी, आमदार  मोहन मते, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अजय चारठाणकर, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, राजेश भगत, विनोद जाधव उपस्थित होते.

सफाई कर्मचाऱ्यांची प्रगती व विकास होण्यासाठी  नागपूरच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विशेष शिबीर घेण्याचा मानस अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना स्वच्छतादूतांबद्दल आपूलकी आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांनी सोडविल्या. त्यांच्या प्रेरणेतून आज 75 वर्षानंतर सफाई कर्मचाऱ्यांसाठी हा महोत्सव होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या  लाडपागे समितीअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना महानगरपालिकेत नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी आमदार मोहन मते यांनी  आपले जीवनमान उंचावण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले.  हा एक अभिनव उपक्रम असून या माध्यमातून सफाई कामगारांना विविध योजनांचा लाभ घेता आला, असे महापालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी सांगितले.  आरोग्य सेवा, घरकुल नोंदणी, रमाई घरकुल वाटप, स्वाधार योजना, अॅट्रासिटी अंतर्गत बळी पडलेल्या कुटुंबाच्या वारसांना पेंशन, जात वैधता प्रमाणपत्र, शिलाई मशिन आदी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यात आला.

समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकणी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या महाशिबीरास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या निमित्ताने  विविध विभाग व महामंडळांनी स्टॉल लावले होते. शासकीय योजनांची मोठ्या प्रमाणात सफाई कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली.