सावनेर २३ : स्थानिक सरकारी आयटीआय परिसरातील बनकर ले-आउटमधील मंदिराजवळ असलेल्या उंबराच्या झाडाच्या खोडातून मागील पाच ते सहा दिवसांपासून सातत्याने पाणी झिरपत असल्याचे तेथील रहिवाश्यांनी सांगितले. ही वार्ता गावात पसरताच तेथे भाविकांची गर्दी वाढू लागली.
पवित्र श्रावण महिना आणि उंबराच्या झाडाचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता, अनेकांनी या घटनेला दैवी चमत्कार मानून पूजा-अर्चाही सुरू केली आहे. उंबराच्या झाडाचे साल, पाने, गोंद, व फळ औषधी गुणधर्मयुक्त असल्याचे मानले जाते.
या संदर्भात भालेराव महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. विलास डोईफोडे यांनी यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्टीकरण दिले. त्यांच्या मते, “या झाडाचे शास्त्रीय नाव Ficus racemosa असून विशिष्ट परिस्थितीत झाडातून पाणी झिरपणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पावसाळ्यात झाडाच्या मुळाभोवती पाण्याचा साठा वाढतो आणि त्यामुळे हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होते. झाडाच्या फांद्या तोडल्यामुळे पानांअभावी बाष्पीभवन प्रक्रिया मंदावते. परिणामी, मुळांनी शोषलेले पाणी दबावामुळे किंवा पृष्ठतल ताणामुळे खोडातून बाहेर झिरपतं.
तसेच, जमिनीतून वाहणारे पाणी जर झाडाच्या खोडातील पोकळीत पोहोचले, तरी अशाच प्रकारे पाणी बाहेर येऊ शकते. उंबराचे झाड जमिनीतील पाण्याचा स्रोत दर्शविणारे झाड असल्यानेही असा प्रकार घडू शकतो,” असे त्यांनी सांगितले.
धार्मिक श्रद्धा आणि निसर्गातील विज्ञान यांचा संगम दाखवणारी ही घटना सध्या सावनेर परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.




