Thursday, April 9, 2026
spot_imgspot_img
spot_img

जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी प्रकरण तक्रारीवर कारवाईची मागणीसाठी पत्रकार परिषदेत न्यायासाठी धाव

– गांधीबाग सहकारी बँक शाखा महाल येथील कर्जदार पंकज भानुसे यांची पुन्हा चौकशीची मागणी

नागपूर :-  येथील पंकज निळकंठराव भानुसे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या गंभीर तक्रारीवर योग्य ती कारवाई न झाल्याचा आरोप करत पुन्हा चौकशी सुरु करण्याची मागणी केली आहे. संबंधित प्रकरणात जातिवाचक अपमानास्पद शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला असून, या संदर्भातील पोलिसांकडून सविस्तर माहितीही मागवण्यात आली आहे. तक्रारदार पंकज भानुसे (रा.मनीष नगर, सोमलवाडा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधीबाग सहकारी बैंक लिमिटेड, महाल शाखेत दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी, कर्ज खाते बंद करण्यासाठी (फायनल सेटलमेंट) आयोजित बैठकी दरम्यान बँकेच्या संचालक मंडळातील सदस्य- रवींद्र दुरुगकर (अध्यक्ष), डॉ. सुभाषचंद्र बजाज, अरुण टिकले, आकाश डंबारे व व्यवस्थापक शमी शेख हे उपस्थित होते. या बैठकीत सर्वांसमोर त्यांना जातीवाचक अपमानास्पद शिवीगाळ करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या घटनेनंतर भानुसे यांनी दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी, कोतवाली पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली होती. तक्रारीसोबत त्यांनी बँकेशी संबंधित सर्व कागदपत्रे तसेच घटनेचे ऑडिओ रेकॉर्डिंग असलेली पेन ड्राईव्हही पोलिसांकडे सादर केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी, कोतवाली पोलिसांकडून मिळालेल्या उत्तरात ही तक्रार फ्लॅट भाडे वादाशी संबंधित असल्याचे नमूद करून प्रकरण निकाली काढण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावर भानुसे यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, ही माहिती चुकीची व दिशाभूल करणारी असल्याचे सांगितले आहे. “माझी तक्रार ही भाडे वादासंदर्भात नसून जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमकीबाबत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, संबंधित बँकेचे संचालक मंडळ वारंवार महाल शाखेत बोलावून मानसिक व वैयक्तिक छळ करत असल्याचा आरोपही भानुसे यांनी केला आहे. २०२२ पासून ते व त्यांचे भाऊ रुपेश भानुसे कर्जाबाबत तडजोडीच्या चर्चेसाठी बँकेशी संपर्कात होते. मात्र, बँकेकडून किरकोळ कारणे देत वाटाघाटी नाकारण्यात आल्या व अतिरिक्त व्याज लावून कर्जाची रक्कम वाढवण्याचा तसेच इतर मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, भानुसे यांनी कोतवाली पोलिसांकडे त्यांच्या तक्रारीवर आतापर्यंत झालेल्या चौकशी व कारवाईबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे प्रकरणाची नव्याने चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची प्रत नागपूर पोलीस आयुक्त, डीसीपी तसेच सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आली असून, प्रकरणाला आता पुढे कोणता वळण मिळते याकडे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com