हंसराज,भंडारा जवाहरनगर :- जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरुद्ध कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी धडक दिली आहे. जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीत छापा टाकून पोलिसांनी एका टिप्परसह एकूण २५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे शाहापूर परिसरात कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी लोकेश भरत वाढई (वय ३७, रा. भिलेवाडा, ता. जि. भंडारा) हा आपल्या ताब्यातील टिप्परमधून विनापरवाना रेतीची वाहतूक करताना आढळून आला.
पोलिसांनी तत्काळ टिप्पर (क्र. MH 36 AA 1012) जप्त केला असून, त्यामध्ये अंदाजे ६ ब्रास रेती सापडली. टिप्परची किंमत सुमारे २५ लाख रुपये तर रेतीची किंमत सुमारे ३६ हजार रुपये असल्याचे सांगितले जाते. एकूण २५.३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पो. नि. चिंचोळकर,यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सोनपीतरे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस स्टेशन जवाहरनगर चे अधिकारी करत आहेत.
अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर जिल्हा पोलिसांकडून पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.