भंडारा :- जिल्ह्यात १६ मे ते १४ जून या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या प्रशिक्षणामध्ये एकूण ३६ प्रशिक्षक (ट्रेनर) सहभागी झाले होते.
प्रशिक्षणादरम्यान मास्टर ट्रेनर शिवरकर तसेच जनगणना विभागाचे चेतन गायधने यांनी उपस्थित प्रशिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले. जनगणना प्रक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे, माहिती संकलनाची पद्धत, अचूकता राखण्याचे उपाय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी सावनकुमार तसेच निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांनीही उपस्थित राहून प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यांनी जनगणना हा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम असून, तो अचूक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले. या प्रशिक्षणामुळे आगामी जनगणना कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.