– कष्टकरी तरुणाची गळफास लावून आत्महत्या
पांढरकवडा :- काबाड कष्टातून संपूर्ण कुटुंबाला आधार देणारा एक तरुण गेल्या कित्येक वर्षापासून स्वत:च्या लग्नासाठी धडपडत होता. पण खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावणाऱ्या या काळात त्याचे लग्न जुळतच नव्हते. शेवटी निराश मनाने या तरुणाने गळफास लावून आपली जीवनयात्राच संपवून टाकली. समाजातील विदारक वास्तव चव्हाट्यावर आणणारी ही घटना पांढरकवडा शहरातील चंद्रशेखर वार्ड परिसरात घडली. सिद्धार्थ मधुकर जंगलवार (३२) असे या मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना ८ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सिद्धार्थ गेल्या बारा वर्षांपासून पांढरकवडा नगरपरिषदेत कचरा गाडीवर कंत्राटी चालक म्हणून कार्यरत होता. लन्न न झाल्यामुळे तो मानसिक तणावात असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी तो कुटुंबासोबत जेवण करून घरी आला होता. काही वेळानंतर घरात एकटाच असतांना त्याने बेडरूममधील स्लॅँबच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतल्याचे आढळले, शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत
घोषित केले. याबाबत मृताची आई अनिता मधुकर जंगलवार यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस पुढील तपास करीत आहे.