– भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आ. चित्रा वाघ यांचा विश्वास
– संसद, विधिमंडळातही महिलांना मिळणार आरक्षण
मुंबई :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागच्या दशकापासून महिला नेतृत्व पुढे आणण्यासाठी सरकारचे ज्या पद्धतीने काम सुरु आहे त्याला मूर्त स्वरूप येताना दिसत आहे. त्याचाच परिपाक म्हणून आता नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर होणार आहे. हा महिलांच्या प्रगतीचा विषय असून यामुळे सरकारच्या या प्रयत्नांमुळे भविष्यात देशभरात नारी शक्तीचा बुलंद आवाज घुमणार असल्याचा विश्वास भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी शनिवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिला मोर्चाच्या प्रणिता चिखलीकर, शीतल देवरुखकर, जान्हवी पारीख अंजारा आदी यावेळी उपस्थित होत्या.
नारी शक्ती वंदन अधिनियमामुळे 33 टक्के म्हणजेच एक-तृतीयांश मातृशक्ती देशातील लोकसभा, राज्य विधानसभा आणि दिल्ली विधानसभेत दिसणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत महिला या विविध धोरणांच्या लाभार्थी होत्या, मात्र आता महिला या धोरणाच्या निर्मिती करणाऱ्या होणार आहेत आणि तीच विकसित भारताची पायाभरणी ठरणार असल्याचे चित्रा वाघ यांनी यावेळी सांगितले.
आ. चित्रा वाघ यांनी सांगितले की, या अधिनियमाच्या अंमलबजावणीमुळे शासनाच्या प्राधान्यक्रमांमध्ये व्यापकपणे बदल झालेला दिसेल. जेव्हा महिलांचा निर्णयप्रक्रियेत सहभाग वाढतो तेव्हा शिक्षण, आरोग्य, पोषण, सुरक्षा, पाणी आणि स्वच्छता यांसारख्या विषयांना अधिक प्राधान्य प्राप्त होते. आपल्या मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिथे 50 टक्के आरक्षण आहे त्यामध्ये महिलांनी त्यांचे नाणे किती खणखणीत आहे हे वाजवून या देशाला दाखवून दिले आहे. हा बदल एका दिवसात झाला नसल्याचे सांगून आ. चित्रा वाघ म्हणाल्या की, त्यासाठी एका दशकाचा कालावधी उलटावा लागला. 2014 साली नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा सर्वात आधी त्यांनी कुठले काम केले असेल तर देशातील महिलांना शौचालये उपलब्ध करून दिली. त्यानंतर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मुले मुलींच्या जन्मदरात वाढ झाली. माध्यमिक शाळांमध्ये मुलींची नावनोंदणी पहिली तर ती 80.2 टक्के इतकी वाढली आहे. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 4.6 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आल्याने मुलींच्या भविष्याला आर्थिक सुरक्षा मिळाली आहे. उच्च शिक्षण आणि तांत्रिक क्षेत्रांमध्ये महिलांचा वाढता सहभाग हा या बदलांचा संकेत देत आहे.
आरोग्य आणि पोषणातही पंतप्रधान नरेंद्र मोदीनी भरीव काम केले आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत 42.7 दशलक्षाहून अधिक महिलांना पोषण सहाय्य मिळाले आहे. पोषण 2.0 अंतर्गत, 1.4 दशलक्षाहून अधिक अंगणवाडी केंद्रांमार्फत 8.17 कोटी लाभार्थ्यांना सेवा मिळत आहे. याचा परिणाम म्हणून मातामृत्यू दरात लक्षणीय घट झाली असून ती महिलांच्या आरोग्याच्या क्षेत्रातील सकारात्मक बदल दर्शवते, असेही त्यांनी नमूद केले.
आर्थिक सक्षमीकरण हा या परिवर्तनाचा अत्यंत महत्वाचा पाया ठरला आहे. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत देशात 32.29 कोटी महिला बँकिंग व्यवस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. मुद्रा योजनेअंतर्गत 68 टक्के महिलांना कर्ज मिळाले आहे, तर 10 कोटींहून अधिक महिला स्वयं-सहायता गटांच्या माध्यमातून स्वतःला संघटित करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहेत. लखपती दीदी आणि ग्रामीण भागातील नमो ड्रोन दीदी यांसारख्या उपक्रमांनी महिलांना त्यांच्या पारंपरिक भूमिकांच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञान आणि उद्योजकतेमध्ये सक्षम केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
प्रधानमंत्री आवास योजनेतून महिलांना घरकुले देण्यात आल्याने त्यांचे मालकी हक्क हे संरक्षित करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. उज्ज्वला योजनेमुळे स्वच्छ इंधन मिळते. जल जीवन मिशन यामुळे महिलांचा वेळ वाचत आहे. महिलांचा सन्मान होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नारी शक्ती वंदन अधिनियमाची अंमलबजावणी प्रभावी आणि परिणामकारक होईल. लोकप्रतिनिधी म्हणून महिलांची संख्या वाढेल तेव्हा या सर्व योजना प्रभावी बनवण्यासोबत नव्या धोरणात त्या सक्रीय होतील, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.